Wed, Dec 11, 2019 11:05होमपेज › Konkan › सहावीतील बालिकेची आत्महत्या 

सहावीतील बालिकेची आत्महत्या 

Published On: Mar 19 2019 1:28AM | Last Updated: Mar 18 2019 10:26PM
आचरा ः वार्ताहर

आचरा-पारवाडी येथील हेमांगी मंदार शिर्के (11) या इंग्लिश मीडियममध्ये सहावी इयत्तेमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनीने घरातील खोलीत लाकडी बारला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

हेमांगी हिचा मृतदेह रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास घरातील खोलीत आडव्या लाकडी बारास नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत तिचे चुलत काका किशोर दत्ताराम शिर्के यांनी आचरा पोलिस स्टेशनला खबर दिली.

अभ्यासात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमी अग्रेसर असणारी हेमांगी आचरा-पारवाडी येथील सामायिक घरात आजोबा,आई भावंडासह राहत होती. तिचे वडील कामानिमित्त परदेशात दुबई येथे असतात. याबाबत किशोर शिर्के यांनी आचरा पोलिस स्टेशनला दिलेल्या खबरीनुसार रविवारी शाळेला सुट्टी असल्याने हेमांगी घरी होती. तिने सकाळी सायकल चालविली. तसेच आईसोबत शेताला पाणी लावून दुपारी जेवणही केलेे. सायंकाळी 6.15 वा.च्या सुमारास तिच्या छोट्या भावाने आईकडे  टीव्हीवर कार्टून लावण्यासाठी हट्ट केला. त्यावेळी  आई  टीव्ही चालू करण्यासाठी खोलीत गेली असता तिला हेमांगी गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आली. हे दृश्य पाहून तिने ओरड मारली. याबाबत खबर मिळताच  आचरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्यासह हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, व्ही. व्ही. केकरे, अक्षय धेंडे, आर. बी. शेवडे, महिला पोलिस कदम, पोलिस पाटील विठ्ठल धुरी आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

हेमांगीचे वडील परदेशात असल्याने ते आल्यानंतर  मंगळवारी आचरा - पारवाडीतील स्मशानभूमीत  तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकानी सांगितले. हेमांगीच्या पश्‍चात वडील, आई, बहीण, भाऊ, आजोबा, काका असा परिवार आहे. हेमांगीच्या अचानक जाण्याने शिर्के परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तिच्या मृत्यूमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण हे करत आहेत.

आचरा परिसरात अशी एखादी घटना घडल्यास  शवविच्छेदन करेपर्यंत शव शीतपेटीत ठेवण्यासाठी  मालवण किंवा कणकवली गाठावी लागते. याचा नाहक त्रास मृताचे नातेवाईक, ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोे. यासाठी आचरा प्रा. आ. केंद्रात  शीतपेटीची सोय करण्याची मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून  होत आहे.