Sun, Jul 21, 2019 16:44
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › श्रीक्षेत्र गणपतीपुळे झाले ‘बाप्पामय’

श्रीक्षेत्र गणपतीपुळे झाले ‘बाप्पामय’

Published On: Jul 31 2018 10:34PM | Last Updated: Jul 31 2018 10:29PMरत्नागिरी : प्रतिनिधी

गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त हजारो भाविकांनी स्वयंभू श्री गजाननाच्या दर्शनाचा लाभ घेतला. अवघे श्रीक्षेत्रच बाप्पामय झाले होते. दिवसभर पावसाने उघडीप दिल्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ न भिजता घेता आला.

गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात अंगारकी चतुर्थीमुळेे मंगळवारी दिवसभर सांगली, सातारा, मिरज व घाटमाथ्यावरील भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. पहाटे 3.30 पासूनच भाविकांनी दर्शन मिळणार यासाठी रात्री 2 वा.पासून दर्शन रांगा लावल्या होत्या. पहाटे 3 वा. 30 मि. मंदिर दर्शनासाठी खुले झाले. यावेळी प्रथम स्वयंभू श्री गजाननाची महापूजा झाली. नंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात सायंकाळी ठीक 4.30 वा. स्वयंभू श्रींची पालखी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत श्रींच्या प्रदक्षिणामार्गे काढण्यात आली. यावेळी पालखी मिरवणुकीत संस्थान श्रीदेव गणपतीपुळेचे सरपंच व प्रमुख पंच मंडळी देवस्थानचे कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व इतर ग्रामस्थ तसेच घाटमाथ्यावरून आलेले भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पालखी मिरवणुकीत ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोष करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्‍तिमय झाला होता.

या अंगारकी चतुर्थीनिमित्त एस. टी. प्रशासनातर्फे भाविकांच्या सोयीसाठी जादा एसटी गाड्यांची सोय करण्यात आली. तसेच पोलिस प्रशासनातर्फे संपूर्ण गणपतीपुळे परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भक्‍तगण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत होते. दर्शनासाठी मोठीच्या मोठी रांग लावल्याचे दिसून येत होते. 

गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात अंगारकी चतुर्थीनिमित्त पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाल्याचे दिसून येत होती. रिकाम्या जागेत पार्किंग, गणपतीपुळे आठवडा बाजार येथे पार्किंग, तसेच सागरदर्शन पार्किंग ही तिन्ही पार्किंग मोठ्या प्रमाणात फुल्‍ल असल्याचे दिसून येत होती. तरीही उत्साह कायम होता.