Thu, Dec 12, 2019 09:22होमपेज › Konkan › तरुणाईची गांजा पार्टी नागरिकांनी उधळली

तरुणाईची गांजा पार्टी नागरिकांनी उधळली

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 17 2018 10:44PM

बुकमार्क करा
सावंतवाडी : प्रतिनिधी  

सावंतवाडी शहरातील जुनाबाजार-  चॅपेल गल्ली या भरवस्तीत मंगळवारी रात्री सुरू असलेली अंमली पदार्थ सेवन पार्टी  शिवसेनेच्या नेत्या आनारोजीन लोबो यांच्यासह नागरिकांनी उधळली. काही महाविद्यालयीन युवक-युवती  खुलेआम गांजा, हफीम तसेच अंमली पदार्थांचे सेवन करीत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.  मात्र, अंधाराचा फायदा घेत त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेबद्दल तत्काळ पोलिसांना कळवूनही पोलीस तब्बल दीड तासांनी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत लोबो यांनी नाराजी व्यक्‍त के ली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरविणारा  ड्रग्ज माफिया कोण याबाबतचा पर्दापाश 23 जानेवारीपर्यंत  न केल्यास शहरातील महिला रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडतील, असा इशारा  आनारोजीन लोबो यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, पोलिस देवानंद माने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यांना आक्षेपार्ह असे काही आढळले नाही तरीही लोबो यांच्या तक्रारीची दखल घेवून तपास केला जाईल, असे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश जाधव यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मागास कल्याण समिती सभापती माधुरी वाडकर, उपसभापती शुभांगी सुकी, भारती मोरे आदी उपस्थित होत्या. अंमली पदार्थ सेवन पार्टीचा पर्दापाश झाल्यानंतर तत्काळ पोलिसांना कळवूनही पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला उशिर लागला तसेच या प्रकरणाची कोणतीही चौकशी दिवसभरात केली नसल्याबद्दलची नाराजी त्यांनी व्यक्‍त केली. घटनास्थळी सिगारेटस्, कोरेक्स, व्हाईटनर्स लिक्‍विड तसेच निरोध पाकीटे पडलेली होती. याशिवाय अंमली पदार्थ सेवन करण्यासाठी लागणारे साहित्यही पडले होते.  पाच हून अधिक युवक-युवती या पार्टीत सहभागी झाल्याचे श्रीमती लोबो  यांनी सांगितले. 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुनही दिवभरात काहीही धागेदोर पोलिसांच्या हाती लागले नाहीत.  हे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी होते. ते सकाळी व रात्री गोळा होतात व असे अंमली पदार्थ सेवन  करतात. पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवावे व असे गैरप्रकार तसेच विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आनारोजीन लोबो यांनी केले. आपल्यामागून आपला मुलगा वा मुलगी काय करते याची माहिती घ्यावी व वेळीच त्यांना रोखावे, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रकरणी 23 जानेवारीपर्यंत पोलिसांनी तपास करुन अंमली पदार्थ पुरविणार्‍या रॅकेटचा शोध न घेतल्यास महिलांचा मोर्चा काढण्याचा इशारा आनारोजीन लोबो यांनी दिला.