Mon, Aug 26, 2019 14:41होमपेज › Konkan › पेणमधून होतोय बाप्पांचा प्रवास

पेणमधून होतोय बाप्पांचा प्रवास

Published On: Jun 26 2019 1:39AM | Last Updated: Jun 26 2019 12:05AM
चिपळूण : खास प्रतिनिधी

कोकणातील महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. मात्र, अलिकडे गावागावातील पारंपरिक गणेश मूर्ती कार्यशाळा आता बंद पडू लागल्या आहेत. कारण गणेशमूर्तींचा प्रवास पेणमधून सुरू झाला आहे. तर येथील कार्यशाळांमध्ये केवळ रंगकाम केले जात आहे.

कोकणातील प्रत्येक गावामध्ये गणेश मूर्ती कार्यशाळा असायच्या. मात्र, आता या कलेचा र्‍हास होऊ लागला आहे. शाडूच्या मातीपासून गावागावात गणेश मूर्ती तयार केल्या जायच्या आणि गावातील प्रत्येक घरात याच मूर्तींची प्रतिष्ठापना केली जायची. मात्र, आता अनेक गावातून या कार्यशाळा बंद पडल्या आहेत. हाताने मूर्तीकाम करणारे कलाकारांची पिढीच आता लोप पावत चालल्याने या कलेला ओहोटी लागली आहे. दिवसेंदिवस वाढणारे शाडूच्या मातीचे दर आणि हाताने मूर्तीकाम करण्यास लागणारे कष्ट यापासून मुक्‍ती मिळविण्यासाठी आता प्‍लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीकडे मूर्तीकारांबरोबरच लोकांचाही ओढा वाढला आहे. मात्र, यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात विरघळत नाहीत. तळाला जाऊन त्या तशाच राहतात. यामुळे पारंपरिक जलस्रोतांचे नुकसान होते. याउलट शाडूच्या मूर्ती पाण्यामध्ये विरघळून जातात. मात्र, अलिकडे मूर्तीकारच पेणमधून मूर्ती आणत असल्याने लोकांसमोर पर्याय राहिलेला नाही. 

दरवर्षी मे महिनाअखेर व जूनच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात मुंबई-गोवा महामार्गावरुन अनेक ट्रक व टेम्पोमधून पेणमधून पीओपीच्या मूर्ती गावोगावी आणल्या जात आहेत. महामार्गावर मूर्ती भरुन आणणारी वाहने अनेकवेळा दृष्टीस पडत आहेत. या मूर्ती गावातील कार्यशाळेत आणून त्या ठिकाणी उर्वरित कामे केली जातात. मूर्तींचे पॉलिश, रंगकाम व सजावट करण्यात येते. वजनाने हलक्या तसेच कमी किंमतीमध्ये या मूर्ती उपलब्ध होत असल्याने पारंपरिक मूर्तीकार देखील पीओपी मूर्तींकडेच वळले आहेत. पेणमध्ये संपूर्ण वर्षभर या मूर्ती तयार केल्या जातात व राज्यासह परदेशात देखील या मूर्ती पाठविल्या जातात.  जिल्ह्यात आणल्या जाणार्‍या मूर्ती रंगकाम करून ठराविक किंमतीमध्ये विकल्या जात आहेत.  यातून पारंपरिक मूर्तीकला लोप पावत आहे.