Sat, Apr 20, 2019 09:58होमपेज › Konkan › कोकण रेल्वेमार्गावर ‘गणपती स्पेशल’ गाड्या

कोकण रेल्वेमार्गावर ‘गणपती स्पेशल’ गाड्या

Published On: Jul 29 2018 11:13PM | Last Updated: Jul 29 2018 11:02PMरत्नागिरी ः  खास प्रतिनिधी

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर आणखी दोन विशेष गाड्यांसह आधी जाहीर केलेल्या 6 गणपती विशेष गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार आहेत. उत्सवासाठी गावी येणार्‍या चाकरमान्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

दि. 13 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. यासाठी मुंंंबईसह पुणे, अहमदाबाद येथून कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. जादा गाड्या जाहीर करूनही चाकरमान्यांंची  तिकिटांसाठी खिडक्यांवर मोठी झुंबड उडत असल्याने प्रतीक्षा यादी वाढत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने रविवारी सीएसटी-सावंतवाडी तसेच पुणे-झाराप-पुणे या मार्गांवर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी मार्गावर  (01013/14)  ही साप्‍ताहिक गाडी धावणार आहे. ही गाडी  दि. 13 सप्टेंबर रोजी सीएसटीहून रात्री 9.20 वा. सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 9.30 वा. ती सावंतवाडीला पोहोचेल. या गाडीचा परतीचा प्रवास दि. 14 सप्टेंबर रोजी सावंतवाडी स्थानकावरून सकाळी 10 वा. सुरू होऊन त्याच दिवशी रात्री 11 वा. मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर संपेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ तसेच झाराप हे थांबे देण्यात आले आहेत.

दुसरी विशेष गाडी पुणे-झाराप-पुणे अशी धावणार आहे. ही गाडी  (01421/22) दि.10 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वा. पुणे येथून कोकण रेल्वेमार्गावरील झाराप स्थानकावर जाण्यासाठी निघेल. ही गाडी दुसर्‍या दिवशी दुपारी 14.45 वा. झारापला पोहोचेल. झारापहून ही गाडी दि. 11  सप्टेंबर रोजी सायंकाळी 3.30 वा.

 सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 6 वा. ती पुण्याला पोहोचेल. या गाडीला चिंचवड, लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्‍वर, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.

 याचबरोबर लो. टिळक टर्मिनस - झाराप, पुणे - सावंतवाडी, पनवेल, सावंतवाडी तसेच पनवेल रत्नागिरी मार्गावर आधी जाहीर केलेल्या सहा गाड्यांना प्रत्येकी दोन दोन जादा डबे जोडण्यात येणार आहेत.