Thu, Jun 27, 2019 16:30होमपेज › Konkan › एकमेकाचे पाय न ओढता समाज बांधवांच्या पाठिशी रहा!

एकमेकाचे पाय न ओढता समाज बांधवांच्या पाठिशी रहा!

Published On: Jun 17 2018 10:27PM | Last Updated: Jun 17 2018 9:47PMमालवण : प्रतिनिधी

गाबित समाजात फार मोठी ताकद आहे. मच्छीमारीसह पर्यटन व्यवसायातून गाबित बांधव उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, आज गाबित - गाबीत भांडत  असल्याने हा समाज संघटित होण्यात अडचणी येत आहेत. याचाच फायदा घेऊन राजकीय पुढारी वाद लावून देऊन आपली पोळी भाजून घेत आहेत. त्यामुळे गाबित समाज बांधवानी एकमेकांचे पाय न ओढता एकमेकांच्या पाठीशी राहिले पाहिजे. एकत्र येत संघटन शक्ती वाढवून आपल्या न्याय हक्कासाठी गाबीत समाजाने आपली ताकद दाखवून दिली पाहिजे, असे प्रतिपादन माजी आ. परशुराम उपरकर यांनी केले. 

गाबीत समाज सिंधुदुर्गच्या वतीने गाबीत समाजाचा महामेळावा रविवारी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात झाला. या मेळाव्याचे उद्घाटन गोव्याचे माजी समाजकल्याण मंत्री अ‍ॅड. चंद्रकांत चोडणकर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर माजी आ. परशुराम उपरकर,  अखिल भारतीय गाबीत समाज मुंबईचे अध्यक्ष अ‍ॅड. काशिनाथ तारी,  सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण ताम्हणकर, जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर, अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष शंकर पोसम, महाराष्ट्र एसबीसी संघर्ष समिती अध्यक्ष शशिकांत आमणे,  सखाराम मालाडकर, मुंबईचे माजी नगरसेवक तानाजी कांदळगावकर, दशरथ बटा, गाबित समाज कर्नाटकचे अध्यक्ष  अ‍ॅड. गजानन तारीकर, अ‍ॅड. विश्‍वनाथ हळणकर, अ‍ॅड. माधवी हळणकर, सुधाकर मोंडकर, गाबीत समाज पुण्याचे संघटक सखाराम कोळंबकर, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, छोटू सावजी, अरविंद मोंडकर, गाबीत समाज मालवणचे अध्यक्ष रवीकिरण तोरसकर, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, मुरलीधर जोशी, बाबी जोगी, मनीषा जाधव, आदी व इतर उपस्थित होते.

 व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा तसेच उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण ताम्हणकर आणि सचिव चंद्रशेखर उपरकर यांचा मालवणातील गाबीत समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाज महासंघातर्फे गाबीत समाज जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण ताम्हणकर यांचा सत्कार करण्यात आला. 

गोव्याचे माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत चोडणकर म्हणाले, गाबीत समाजाचा उल्लेख रामायण, महाभारतामध्ये आढळून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये गाबीत समाजाचे मोठे योगदान होते. त्यामुळे समाज बांधवांनी आपण गाबीत असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे. आपण मागासलेले आहोत हा न्यूनगंड मनातून काढला पाहिजे. आपल्यातील मतभेद, हेवेदावे विसरून समाज उन्नतीसाठी तसेच आपल्या न्याय हक्कांंसाठी एकत्र आले पाहिजे. यासाठी समाजात जागृती होणे महत्वाचे आहे. गाबीत समाजाचा मुख्य व्यवसाय मच्छीमारी असून आज मत्स्य व्यवसायाला कृषी खात्यात समाविष्ट करून दुय्यम स्थान देण्यात आले आहे. मच्छीमारांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र मत्स्य खाते निर्माण होणे गरजेचे आहे, असेही श्री. चोडणकर 
म्हणाले.

अखिल भारतीय गाबित समाज मुंबईचे अध्यक्ष अ‍ॅड. काशीनाथ तरी यांनी गाबीत समाज समस्या व संघटन यावर विस्तृत मार्गदर्शन केले.  विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) आरक्षण आणि कायदेशीर तरतुदी याबाबत महाराष्ट्र एसबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत आमणे यांनी मार्गदर्शन  केले. संजय पराडकर यांनी गाबीत समाज वधुवरांच्या समस्या व निराकरण या विषयावर तर नीलक्रांती योजना या विषयावर रवीकिरण तोरसकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक चंद्रशेखर उपरकर यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले.