Tue, Nov 20, 2018 21:26होमपेज › Konkan › कोयनेतून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती

कोयनेतून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती

Published On: May 25 2018 11:34PM | Last Updated: May 25 2018 10:28PMअलोरे : वार्ताहर

कोयना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दहा टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. त्यामुळे कोयना प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करून राज्याची विजेची गरज भागवली जात आहे.
कडक उन्हामुळे राज्यात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. महानिर्मिती कंपनीच्या विविध प्रकल्पातून 13 हजार 602 मेगावॉट वीज निर्मिती सुरू आहे. यामध्ये कोयना प्रकल्पाचा वाटा 1956 मेगावॅट इतका आहे. कोयना धरणात पाणी साठविण्याची क्षमता 105.25 टीएमसी आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. 

वर्षभरात पाण्याचे नियोजनही व्यवस्थित झाले. त्यामुळे धरणात 33.41 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पूर्वेकडील आणि पश्‍चिमेकडील वीज प्रकल्प सुरू आहेत. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार धरणातील 67.5 टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी आणि 35 टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचनासाठी सोडले जाते. आतापर्यंत 65.12 टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी आणि 37.94 टीएमसी पाण्याचा वापर सिंचनासाठी झाला आहे.

धरणातील पाणी साठ्याचे तांत्रिक वर्ष 1 जूनपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी धरणातील पाण्याचे नियोजन कोयना धरण सिंचन विभाग आणि महानिर्मिती कंपनीकडून सुरू आहे. 
कोयना प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता 1960 मेगा वॅट इतकी आहे. 1956 मेगावॉट वीज निर्मिती सुरू आहे. कोयना प्रकल्पाचे सर्व युनिट चालू आहेत. त्यामधून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे. 
या प्रकल्पातून दररोज 27.725 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होत आहे असल्याची माहिती पोफळी येथील वीज निर्मिती कंपनीतील मुख्य अभियंता चंद्रशेखर बाबर यांनी दिली.