Tue, Apr 23, 2019 22:35होमपेज › Konkan › खेडमध्ये ‘फुकट्यां’कडून 43 हजारांचा दंड वसूल

खेडमध्ये ‘फुकट्यां’कडून 43 हजारांचा दंड वसूल

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 13 2018 10:34PMखेड : प्रतिनिधी

कोकण रेल्वे मार्गावर शनिवारी 10 फेब्रुवारीच्या पहाटे मुंबईतून खेड रेल्वे स्थानकात ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ने विनातिकीट प्रवास करणार्‍या 132 फुकट्या प्रवाशांना रेल्वेच्या भरारी पथकाने पकडले. या सर्वांकडून तब्बल 43 हजार 720 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आत्तापर्यंत चालू वर्षातली ही पहिली मोठी कारवाई असून गेल्यावर्षी चारवेळा एकूण 350 फुकट्या प्रवाशांकडून 2 लाख 25 हजार रूपयांचा दंड एका खेड रेल्वे स्थानकातून विशेष भरारी पथकाने वसूल केला आहे. दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढतच असल्याचे दिसून येत आहे. तसेच ही कारवाई पुढेही चालू राहणार असून या दरम्यान सर्व एक्सप्रेस गाड्यांची तपासणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘येवा कोकण आपलाच आसा’ असं म्हणत झुकझुकगाडीनं प्रवास करायला सगळ्यांनाच आवडते. पण अनेक फुकटे प्रवासी या संधीचा विनातिकीट प्रवास करून गैरफायदा घेताना आढळताहेत. त्यामुळेच कोकण रेल्वेतून  तिकीटाविना प्रवास करणार्‍या फुकट्या प्रवाशांना आता रेल्वे प्रशासनाने चांगलाच धडा शिकवायचे ठरवले आहे. कोकण रेल्वेच्या भरारी पथकाने नुकत्याच हाती घेतलेल्या कारवाईतून हे निदर्शनास आले आहे.

कोकण रेल्वेने केलेल्या सर्वेक्षणानुसार कोकणात गणपती, शिमगा, नवरात्री अशा सणासुदीच्या काळात विनातिकीट प्रवास करणार्‍यांची संख्याच जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. खरेतर कोकणरेल्वे ही प्रवाशांच्या सेवेसाठी बाकी वाहतूक सेवांपेक्षा अत्यंत अल्प दरात जलद, सुरक्षित, सुखकर आणि आनंदी अशी सेवा देत आहे. त्याचा प्रवाशांनी योग्य तिकीटासह पुरेपूर आस्वाद घ्यावा आणि रेल्वेला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना करण्यात येत आहे. या कारवाईचा धसका प्रवाशांनी घेतला आहे.

करंट तिकीट काढूनही दंडाचा भुर्दंड

अनेकवेळा आरक्षित तिकीट मिळत नाही किंवा अचानक जावे लागत असल्याने प्रवासी रेल्वे स्थानकावर करंट तिकीट काढतात आणि एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करतात. मात्र, अशावेळी तपासणीत प्रवासी करंट तिकीट दाखवतात. प्रवाशांना दंडाची पावती देण्यात येते आणि आर्थिक भुर्दंड पडतो. असे प्रवासी फुकटे म्हणून गणले जातात. या मार्गावर धावणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये असा अनुभव सातत्याने येतो. विशेषकरून चिपळूण, खेडमधील प्रवाशांची यामुळे अडचण निर्माण होते. तिकीटाचे पैसे दिले असतानाही नाहक दंडाचा भुर्दंड पडतो.