Mon, May 27, 2019 01:01होमपेज › Konkan › चिपळूणवासीयांना बनविले कोट्यवधी रुपयांना ‘येडू’

चिपळूणवासीयांना बनविले कोट्यवधी रुपयांना ‘येडू’

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 11:09PM

बुकमार्क करा
 

चिपळूण : खास प्रतिनिधी

‘हम आपको अमीर बनाएंगे’ असे वर्षभर सांगत चिपळूणवासीयांना एका कंपनीने कोट्यवधी रुपयांना ‘येडू’ बनविले आहे. याप्रकरणी ‘ईडू अँड अर्न कन्सल्टन्सी’चा संचालक रवीकिरण बटूला याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. यामुळे  सुमारे 25 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेले शहर परिसरातील गुंतवणूकदार धास्तावले आहेत. बुधवारी सायंकाळी या कंपनीच्या कार्यालयासमोर ठेवीदारांनी मोठी गर्दी केली. अखेर याप्रकरणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

शहरामध्ये ‘ईडू अँड अर्न कन्सल्टन्सी’ या कंपनीच्या माध्यमातून  कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. स्थानिक लोकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडून त्यातून नेटवर्किंगच्या माध्यमाने जाहिराती पाहायच्या आणि दामदुप्पट उत्पन्‍न मिळवायचे, असे आमिष दाखविण्यात आले. मात्र, गुंतवणूकदारांना परतावा न मिळाल्याने अखेर एकाने येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पेठमाप येथील इम्तियाज मुकादम यांनी चिपळूण पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 9 रोजी रात्री उशिरा रविकिरण बटूला याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुकादम यांनी ‘ईडू’च्या योजनेअंतर्गत दि. 5 व 9 सप्टेंबर 2017 रोजी तीन लाख रुपये भरले. त्या नंतर त्यांची बहीण परवीन इमरान शिरोळकर यांनी आणखी दीड लाख रुपये गुंतविले. त्या बदल्यात त्यांना कंपनीकडून 31 आयडी देण्यात आले.

बायनरी , चेन मार्केटिंगची  योजना
दररोज वेबसाईटवरील दहा जाहिराती पाहिल्यावर 70 रुपये परतावा मिळेल व या योजनेसाठी सभासद जोडल्यास दोन सभासदांमागे एक हजार रुपये मिळतील, अशाप्रकारे बायनरी व चेन मार्केटिंगची ही योजना होती. परंतु, मुकादम यांना गेल्या काही दिवसांत परतावा मिळणे कठीण झाले. त्यांचे 85 हजार रुपये कंपनीकडे अडकले. अखेर प्रतीक्षा करून ते न मिळाल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या नुसार ‘द प्राईज चीट अ‍ॅण्ड मनी सर्क्युलेशन’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून फसवणुकीचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, ‘ईडू’बाबत तक्रार झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. कंपनीचे गुुंतवणूकदार कंपनी कार्यालयाकडे धाव घेऊ लागले. अखेर या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. शहर परिसरात 25 कोटींहून अधिक रुपयांची ही फसवणूक असावी, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. आता हे प्रकरण उघड होणार असून तक्रारदार वाढणार आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर करीत आहेत.
हजारोंनी कोट्यवधी गुंतवले

गेले वर्षभर शहरात ही कंपनी सुरू होती. खेडमध्येही या कंपनीचे कार्यालय उघडण्यात आले होते. या माध्यमातून कंपनीत जिल्हाभरातील हजारो लोकांनी कोट्यवधी रुपये गुंतविल्याचे बोलले जात असून या बाबत राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, मार्केटिंग क्षेत्रातील व्यक्‍ती, उद्योगजक व्यापारी ते अगदी तरूणांपर्यंत लोकांनी पैसे गुंतविले आहेत.