Tue, Mar 19, 2019 09:14होमपेज › Konkan › जिल्हा.प.कडे आठ दिवसांत चार डॉक्टर

जिल्हा.प.कडे आठ दिवसांत चार डॉक्टर

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 16 2018 10:15PMरत्नागिरी : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारावी, तसेच तेथील आरोग्य सेवेची माहिती व्हावी यासाठी शासनाने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर या डॉक्टर्सना ग्रामीण भागात एक वर्ष सेवा करण्याचे बंधनकारक केले आहे. याचा फायदा अनेक ठिकाणी होत असून  गत आठ दिवसांत चार ठिकाणी डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारण्यास मदत होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यम अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.

ग्रामीण भाग शहरांपासून अनेक किमी दूर असल्याने तेथे जाण्यास डॉक्टर तयार नसतात. परिणामी तेथे आरोग्य सेवेबाबत अनेक समस्या उद्भवतात. यावर तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण 
केल्यानंतर ग्रामीण भागात वर्षभर काम करण्याचा पाच लाख रुपयांचा बॉण्ड प्रत्येकाकडून  करुन घेतला जातो. शासनाकडून झालेल्या नियुक्‍तीत आठ दिवसांमध्ये मंडणगड, दापोलीतील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर देण्यात आले आहेत. त्यात देव्हारे, आंजर्ले, केळशी आणि पणदेरी यांचा समावेश आहे. 

जिल्हा परिषदेची 65 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून 141 वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे मंजूर आहेत. त्यातील चाळीस टक्के पदे रिक्‍त आहेत. एका डॉक्टरला चोवीस तास काम करावे लागत आहे. डॉक्टर नसतील तर ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यात मदत होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर आरोग्य केंद्रातील रिक्‍तपदांची यादी ठेवली जाते. त्यातून त्यांनी आरोग्य केंद्राची निवड करावयाची आहे. या प्रक्रियेतून पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला चार डॉक्टर मिळाले आहेत. या कालावधीत त्या डॉक्टरकडून सेवा खंडित झाली तर बॉण्ड जप्त करण्याचीही तरतूद आहे.

जिल्ह्यात एमबीबीएसची पदे रिक्‍त असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून बीएएमएस डॉक्टर कंत्राटी तत्त्वावर भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याअंतर्गत आतापर्यंत 30 डॉक्टर नियुक्‍त करण्यात आले. मोठ्या लोकसंख्येच्या किंवा जास्त संवेदनशील ठिकाणी एका एमबीबीएस डॉक्टरबरोबर बीएएमएसची नियुक्‍ती केली आहे. यामुळे आरोग्यसेवेवरचा ताण कमी होत आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये आणखी काहीजण बॉण्डवरील नियुक्‍ती होणार असल्याने आणखीन काही वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात मिळतील, अशी माहितीही त्यांनी दिली.