Sun, Apr 21, 2019 03:50होमपेज › Konkan › अडीच लाखांची विदेशी दारू जप्त

अडीच लाखांची विदेशी दारू जप्त

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 22 2018 10:55PMकणकवली : प्रतिनिधी

एरव्ही गोवा ते मुंबई अशी गोवा बनावट दारूची बेकायदेशीरीत्या वाहतूक आणि विक्री होत असते. मात्र, बुधवारी मुंबई ते गोवा अशी लक्झरी बसमधून विदेशी महागड्या दारूची वाहतूक होत असल्याची ‘टिप’ राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली आणि दुपारी 2.30 वा. या विभागाच्या कणकवलीतील कार्यालयासमोरच लक्झरी बसमधून 2 लाख 31 हजार 500 रु. किमतीची स्कॉटलंड देशातील निर्मिती असलेली महागडी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी नागेश प्रदीप सकपाळ (34, रा. पोलादपूर-रायगड) याला अटक करण्यात आली. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाला याबाबतची ‘टिप’ मिळाल्यानंतर बुधवारी कणकवलीतील कार्यालयासमोरच महामार्गावर सापळा रचण्यात आला. दुपारी 2.30 वा. च्या सुमारास एका लक्झरी बसमधून मुंबई ते गोव्याच्या दिशेने महागड्या विदेशी दारूची वाहतूक होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही बस अडवली. या बसच्या डिकीमध्ये विदेशी महागड्या दारूचे बॉक्स काही पिशव्यांमध्ये पॅक करण्यात आले होते. यामध्ये ग्लेनफेडीच कास्क कलेक्शन सिंगल माल्ट स्कॉच विस्की नावाच्या स्कॉटलंड या देशात निर्मित झालेल्या विदेशी बनावटीच्या 1 लि. मापाच्या दहा काचेच्या सिंगल बाटल्या ग्लेनफेडीच सिंगल माल्ट 15 इयर ओल्ड स्कॉच व्हिस्की नावाच्या 1 ली. मापाच्या तीन काचेच्या बाटल्या, 12 इयर ओल्ड व्हिस्की नावाच्या 10 काचेच्या बाटल्या, दि ग्लेनलिविट फेंच ओक रिझर्व सिंगल माल्ट व्हिस्की 15 इयर ओल्ड नावाच्या विदेशी बनावटीच्या 1 ली. मापाच्या दहा बाटल्या  अशी मिळून 2 लाख 31 हजार रू.किंमतीची दारू जप्त करण्यात आली. 

एक्साईजच्या आयुक्‍त आश्‍विनी जोशी, विभागीय आयुक्‍त व अधीक्षक सिंधुदुर्ग वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक राजन साळगावकर यांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये सहाय्यक दुय्यम निरीक्षक चंद्रकांत पवार, गोपाळ राणे, जवान सुरज चौधरी, महिला जवान स्नेहल कुवसेकर, वाहनचालक रणजित शिंदे, मदतनीस श्री. खान, श्री. शहा यांनी सहभाग घेतला. अधिक तपास राजन साळगांवकर करत आहेत.