होमपेज › Konkan › कणकवलीसाठी पाच कोटी : चव्हाण

कणकवलीसाठी पाच कोटी : चव्हाण

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 10:30PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली शहर म्हटले की संदेश पारकर असे समीकरण आहे. त्यांनी या शहराच्या विकासाला खर्‍या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे. विविध सेवाभावी उपक्रम ते सातत्याने राबवत असतात. याहीपुढे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून कणकवली शहराच्या विकासाला भरीव निधी दिला जाईल. आजच दोन कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ आपण केला. तर निवडणुकीपूर्वी येत्या काही दिवसात आणखी पाच कोटींचा निधी कणकवली शहराच्या विकासासाठी तातडीने उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही भाजपचे नेते, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. 

कणकवली भगवती मंगल कार्यालयात भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक झाली. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, युवा नेते संदेश पारकर, प्रदेश चिटणीस राजन तेली, अतुल रावराणे, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, राजू राऊळ, जयदेव कदम, राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा उपाध्यक्षा सौ. राजश्री धुमाळे, देवगड सभापती जयश्री आडिवरेकर, जिल्हा संपर्कप्रमुख हनुमंत सावंत, कणकवलीचे उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर, प्रांतिक सदस्या सौै. प्रज्ञा ढवण, शहर महिलाध्यक्षा सौ. गीतांजली कामत, सौ. कर्पे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

ना. रवींद्र चव्हाण म्हणाले,कणकवलीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी येत्या काही दिवसात नगरोत्थान आणि वैशिष्ट्यपूर्णमधून पाच कोटीचा निधी देण्याची ग्वाही दिली आहे. पहिल्या टप्प्यात दोन कोटींचा आणि दुसर्‍या टप्प्यात तीन कोटींचा जीआर निघेल. या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागतील. असा दावा त्यांनी केला.  भाजपचे सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करून निवडणूकीत भाजपला विजय मिळवून देतील. गेल्या अडीज वर्षात रस्ते, जलशुध्दीकरण प्रकल्पसह अनेक कामे मार्गी लागली आहेत असेही ते म्हणाले. संदेश पारकर यांनी गेल्या अडीच  वर्षांत शहरात दहा कोटींहून अधिक विकासकामे कामे मार्गी लावल्याचे सांगत ही निवडणूक भाजप विकासाच्या मुद्यावर लढविणार असल्याचे सांगितले. 

कणकवली न. पं. निवडणुकीबाबत  बोलताना ना. चव्हाण म्हणाले, आधी निवडणूक जाहीर होऊ दे. याबाबत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून येणार्‍या काळात ज्या दिशेने जायचे आहे त्याबाबत निर्णय घेऊ. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांची मते विचारात घेतली जातील.  जो काही निर्णय होईल तो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मान्य असेल, असेही ते म्हणाले. आपण पाच जिल्ह्यांचा संपर्कमंत्री आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात भाजप शतप्रतिशत झाली पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. गेल्या  साडे तीन वर्षात केंद्र शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रू. ची विकासकामे आम्ही मार्गी लावली आहेत. कर्जमाफी करून आम्ही शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आमचे मित्रपक्ष किंवा विरोधक कुरघोडीचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनता भाजपच्याच पाठीशी आहे. अनेक पक्षातील नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकजन प्रवेश करत आहेत, असेही ना. चव्हाण म्हणाले.

शुक्रवारी ना. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वैभववाडीचे माजी उपसभापती बंड्या मांजरेकर आणि कोटकामतेतील स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे  जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितले.