मालवण : वार्ताहर
दशावतार ही कोकणची लोककला आहे. त्या कलेचे डबलबारी भजनांमध्ये काही बुवांद्वारे नको त्या पद्धतीने सादरीकरण करुन विडंबन केले जाते. ते रोखण्यासाठी तसेच अशा बुवांना योग्य तो समज देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार लोकनाट्य मंडळाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा भजन संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. दशावतार कलेचे विडंबन रोखल्यास ज्याठिकाणी डबलबारी भजनाच्या वेळी दशावतार सादर करण्यात येत असेल तेथे जाऊन भजनबारी बंद करण्यात येईल, असा इशाराही दशावतारी कलावंतांनी यावेळी दिला.
सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार लोककला मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ दशावतारी कलाकार बाळा सावंत, सुहास माळकर, दिलीप मेस्त्री, संतोष सामंत, दत्तप्रसाद शेणई, शिवप्रसाद मेस्त्री, उमेश मेस्त्री, भाई मांजरेकर, वैभव मांजरेकर आदी उपस्थित होते.
दशावतार ही कोकणची लोककला महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही सादर केली जाते. मात्र, अलीकडे काही वर्षांत या लोककलेचे दुरंगी, तिरंगी डबलबारी भजनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विडंबन होत आहे. काही बुवा लोकांचे मनोरंजन होण्यासाठी दशावतार कलेतील पात्रांप्रमाणे मुखवटा लावून नृत्य करतात. तर दशावतारातील अभंग डबलबारी मध्ये सादर करतात, हे योग्य नाही. याला काही प्रमाणात आयोजकही तेवढेच जबाबदार असतात. आयोजकांनीही डबलबारीत दशावतार सादर करणार्या बुवांना विरोध करावा. सध्या नवीन पिढीमध्येही वैचारिक पातळी खालावल्यामुळे अशा बुवांना प्रोत्साहन मिळते. अशी टीका करताना अशा बुवांना भजन रसिकांनी प्रोत्साहन देऊ नये. असे आवाहन दशावतार कलाकारांनी केले आहे.
दशावतारा पेक्षा भजनाचा प्रचार करा दशावताराचा प्रचार करण्यापेक्षा तुम्हाला भजनाचा प्रचार करण्याची गरज आहे. भजनात प्रगती करा, असा सल्ला या दशावतारी कलाकारांनी भजनी बुवांना दिला आहे.