Fri, Jul 19, 2019 16:02होमपेज › Konkan › दोडामार्गात आढळला दुर्मीळ ‘उडणारा सरडा’

दोडामार्गात आढळला दुर्मीळ ‘उडणारा सरडा’

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 04 2017 10:59PM

बुकमार्क करा

आंबोली : निर्णय राऊत

राज्यात पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडामार्ग येथील जंगलात उडणार्‍या सरड्याची नोंद झाली आहे. दोडामार्गातील वन्यप्राणी छायाचित्रकार मकरंद नाईक व पुणे येथील निसर्ग अभ्यासक अनिश परदेशी यांनी नुकताच हा शोध जगासमोर आणला. यापूर्वी या सरड्याची नोंद गोवा, कर्नाटक तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश येथेच होती. परंतु या तरुणांनी या जंगलमय भागामध्ये फिरत असताना या उडणार्‍या सरड्याची नोंद घेतली व त्याचे निरीक्षण करून त्याबाबतचा शोधनिबंधही लिहिला. या सरडर्‍याला इंग्लिशमध्ये  ‘फ्लाईंग लिझार्ड’ किंवा  ‘ड्रॅको’, ‘ग्रामीण भाषेमध्ये ‘सरडा’ किंवा ‘उडणारा सरडा’ तर शास्त्रीय भाषेमध्ये या सरड्याला ‘ड्रेको ड्यूस्यूमेरी’ असे म्हटले जाते. दोडामार्गमधील तिलारी या अतिसंवेदनशील व घनदाट जंगलांमध्ये या सरड्याचा वावर सर्रास आढळून येत आहे.

हा सरडा झाडावर राहणं पसंत करतो. तपकिरी चॉकलेटी रंगाचा हा सरडा एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उडत जाण्यात माहिर असतो. हा सरडा सहा ते आठ इंचापर्यंत वाढतो. या सरड्याच्या पुढच्या पायापासून ते मागच्या पायापर्यंत पातल त्वचेचा एक पडदा जोडला गेलेला असतो. या पडद्याच्या साहाय्याने व हवेच्या मदतीने तो सरडा आपले चारही पाय रुंद करतो व या पडद्याच्या सहाय्याने एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उडत जावून स्थिरावतो. या पडद्याचा उपयोग एका जागेवरून दुसर्‍या जागेवर जाण्यासाठी तर होतोच शिवाय साप पक्षी यासारख्या त्याच्या शत्रूंपासून बचाव करण्यासाठीही त्याला या पडद्याचा उपयोग  होतो. या सरड्याची मादी जमिनीवर अंडी घालते. मातीमध्ये डोक्याने छिद्र करते. त्यामधे 2-5 अंडी घालतेे.यावेळी 24 तास अंड्यांचे संरक्षणही ते करते.अशा या दुर्मिळ होत चाललेल्या सरड्याच्या आदिवासला धोकाही पोहोचू लागला आहे . 

दोडामार्ग तिलारी या भागांमध्ये तर मोठ्या प्रमाणावर होत चाललेली वृक्षतोड ही या सरड्यासह इतर वन्य प्राण्यांसाठीही चिंताजनक बनत चाललेली बाब आहे. या जंगलात वाघापासून,किंग कोब्रा, हॅम्प नोज पिट वायपर, उडणारा सरडा, लाजवंती, वनमानव यासारख्या दुर्मीळ आणि धोक्यात येत चाललेल्या वन्यप्राण्यांचा मोठया प्रमाणात वावर या जंगलांमध्ये आहे. जंगलाच्या संवर्धनासाठी वन खात्याने कठोर कायदे बनवून जंगलस वाचवले नाही तर येत्या काळात हे दुर्मीळ वन्य पाणी कायमचे नामशेष होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्‍त केली आहे. या शोधकार्यात व शोधनिबंध लिहिण्यास या दोघांना प्रवीण देसाई, अश्‍विनी जोशी, काका भिसे, रमण कुलकर्णी, प्रशांत जाधव, फारुख मेहतर, गिरीश पंजाबी, देव शेटकर यांचे सहकार्य लाभले.