Mon, Jan 27, 2020 11:55होमपेज › Konkan › रत्नागिरीत बंदी झुगारून मासेमारी

रत्नागिरीत बंदी झुगारून मासेमारी

Published On: Jun 07 2019 1:50AM | Last Updated: Jun 06 2019 10:49PM
रत्नागिरी : प्रतिनिधी
एक जूनपासून सागरी मासेमारीला बंदी घातलेली असतानाही अनेक छोटे मच्छीमार मासळी मिळविण्याच्या हव्यासापोटी बंदीचे  उघडपणे उल्‍लंघन करीत आहेत. मत्स्य व्यवसाय विभागाचे आदेश पायदळी तुडवून येथील किनार्‍यालगत मासेमारी सुरू आहे. मत्स्य व्यवसाय विभागाकडेही नौका नसल्याने सध्या बंदरांमध्येच अधिकार्‍यांना तळ ठोकून कारवाईसाठी वाट पाहावी लागत आहे. गुरुवारी भाट्ये किनार्‍यानजीक वीस ते पंचवीस नौका भर दिवसा मासेमारी करताना आढळल्या.

1 जून ते 31 जुलैपर्यर्ंत मासेमारी बंदी लागू झाल्यापासून रत्नागिरी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांनी अनधिकृत मासेमारी करताना दहा नौकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून हजारो रुपयांची मासळीही हस्तगत केली होती. सलग दोन दिवस झालेल्या कारवाईनंतर अनधिकृत मासेमारी करणार्‍यांनीही दोन दिवस बोटी समुद्रात ढकलल्या नाहीत. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच किनारपट्टीनजीक मासेमारी करताना अनेक नौका दिसून येत होत्या.

भगवती किल्‍ला लाईट हाऊस ते फणसोप-कसोप डोंगरा दरम्यानच्या समुद्रातील पट्ट्यात सर्वाधिक नौका दिसत होत्या. या भागात सुमारे 20 ते 25 छोट्या नौका मासेमारी करताना दिसून येत होत्या. गुरुवारी ढगाळ हवामान झाले होते. सकाळपासूनच पावसाची शक्यता होती. मात्र, समुद्र शांत असल्यामुळे मच्छीमारांनी आपल्या नौका समुद्रात लोटल्या होत्या. भाट्ये समुद्रकिनार्‍यापासूनच अगदी हाकेच्या अंतरावर या नौका मासेमारी करताना दिसत होत्या.

बंदी कालावधीत मत्स्य व्यवसाय विभागाच्या ताब्यातील नौकाही बंद झाल्याने, अनधिकृत मासेमारी करणार्‍या या नौकांवर समुद्रात कारवाई करणे दुरापास्त बनले आहे. परंतु, लॅण्डींग पॉईंटवर या नौकांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी तैनात करण्यात येणार असल्याचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्‍त आनंद पालव यांनी सांगितले. अनधिकृत मासेमारीवर अधिकारी वर्ग लक्ष ठेऊन असल्याचेही त्यांनी सांगितले.

मिनी पर्ससीन नौकेवर कारवाई

बंदी आदेश झुगारून किनार्‍यालगत मासेमारी केल्याबद्दल मत्स्य व्यवसाय विभागाकडून सुभाष तांडेल यांच्या मालकीच्या मिनी पर्ससीन नौकेवर अधिकार्‍यांनी कारवाई केली. या नौकेवर मत्स्य व्यवसाय अधिकार्‍यांना सुमारे 2800 रुपयांची मासळी आढळली. ही सर्व मासळी यावेळी जप्‍त करण्यात आली.