Thu, Apr 25, 2019 23:23होमपेज › Konkan › किल्ले सिंधुदुर्गनजीक मच्छिमार नौकेला जलसमाधी

किल्ले सिंधुदुर्गनजीक मच्छिमार नौकेला जलसमाधी

Published On: Jul 17 2018 11:00PM | Last Updated: Jul 17 2018 10:30PMमालवण : प्रतिनिधी 

मासेमारी बंदी असतानाही मालवण-दांडी समुद्रात पातीच्या सहाय्याने मासेमारीसाठी गेलेली मच्छिमारी नौका मंगळवारी सकाळी सिंधुदुर्ग किल्ल्यानजीक समुद्रात बुडाली. सुदैवाने या पातीवरील चारही मच्छीमारांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. सध्या मासेमारी बंदी कालावधी सुरू असताना समुद्रात मासेमारी होत असल्याकडे मत्स्य व्यवसाय विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे या दुर्घटनेवरुन दिसून आले.

 याबाबत  सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त आर. आर. महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेची आपल्याला माहिती नाही. मात्र, या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी मत्स्य परवाना अधिकारी सतीश खाडे यांना दिले आहेत.

 मंगळवारी सकाळी चार मच्छीमार एक पात घेऊन मासेमारीस गेले होते.  दरम्यान समुद्री उधाण व वार्‍याचा जोर असल्याने ही पात समुद्रात बुडाली आणि चारही जण समुद्रात फेकले गेले. या चारहीजणांनी पोहत लगत असलेला पद्मगड किल्ला गाठला. या घटनेची माहिती मिळाल्यावर काही स्थानिक मच्छीमारांनी दुसर्‍या नौकेच्या साहाय्याने त्यांना सुखरूप किनार्‍यावर आणले. सध्या मासेमारी बंदी कालावधी असताना मच्छीमारांची पात बुडाल्याची घटना समोर आल्याने मत्स्य व्यवसाय विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या घटनेची माहिती कोणाला मिळू नये यासाठी किनारपट्टीवर कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती.