होमपेज › Konkan › मच्छीमार बांधवांसाठी ‘आम्ही निरोगी मच्छीमार’ अभियान

मच्छीमार बांधवांसाठी ‘आम्ही निरोगी मच्छीमार’ अभियान

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 09 2017 8:16PM

बुकमार्क करा

मालवण :  वार्ताहर

भारतातील मच्छीमार मत्स्यदुष्काळाचा सामना करीत आहे. मासेमारीच्या वेळामधील अनियमितता, बदलता निसर्ग व परिस्थितीशी सतत संघर्षाचा परिणाम मच्छीमारांच्या आरोग्यावर होत आहे. मच्छीमारांमध्ये रक्‍तदाब, मधुमेह, हृदयरोग, अस्थिरोग, दृष्टीदोष तसेच क्षारयुक्‍त पाण्यामुळे मूत्राशयाचे आजार याचे प्रमाण वाढले आहे. याची गंभीर दखल रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर तसेच नॅशनल फिश वर्कर्स फोरम या राष्ट्रीय संघटनेने घेतली असून  आम्ही निरोगी मच्छीमार अभियान मागील वर्षांपासून सुरू केलेले आहे.

जिल्ह्यातील मच्छीमार व त्यांचे कुटुंबीय रक्‍तदाब, मधुमेह, हृदयविकार, अस्थिरोग, दृष्टीदोष तसेच मूत्राशयाचे आजार यापासून दूर राहावेत यासाठी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्ट या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थेच्या केंद्रामध्ये वरील आजारासंबंधी निदान व उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. निरोगी मच्छीमार अभियानाअंतर्गत गुरुवार  ते  रविवार सकाळी 9 ते 2 या वेळेत दररोज 25 मच्छीमारांची मोफत तपासणी केली जाणार आहे.रोग निदान चाचणी झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर मोफत मार्गदर्शन करणार आहेत.

निरोगी मच्छीमार अभियान अंतर्गत गेल्या वर्षभरात सुमारे  पाचशे मच्छिमारांनी याचा फायदा घेतला आहे. या  अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  सुमारे 5000 मच्छीमार व त्यांचे कुटुंबीय यांची आरोग्य तपासणी करून तो अहवाल मच्छीमार आरोग्य धोरण बनविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे सुपूर्द केला जाणार आहे. जास्तीत जास्त मच्छीमार व त्यांच्या कुटुंबीयांनी या अभियानाचा लाभ घेऊन निरोगी आयुष्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रविकिरण  तोरसकर यांनी केले आहे.