Wed, Mar 20, 2019 08:31होमपेज › Konkan › मच्छीमार हल्लाबोल प्रकरण: आणखी सात खलाशांना अटक

मच्छीमार हल्लाबोल प्रकरण: आणखी सात खलाशांना अटक

Published On: Feb 15 2018 10:30PM | Last Updated: Feb 15 2018 10:04PMमालवण : प्रतिनिधी

गोव्यातील ट्रॉलर्सवरुन मासळीची लूट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जोसेफ नरोना याच्या नौकेवरील सात खलाशांना गुरुवारी मालवण पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 17 फेब्रुवारीपर्यंत  पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी सुरू केलेल्या धरपकड मोहिमेत संशयित म्हणून महेश देसाई (रा. गवंडीवाडा) या मच्छिमार कार्यकर्त्याला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यासमोरून ताब्यात घेतले. या तीन दिवसात नऊ मच्छीमारांना अटक केली आहे. दरम्यान मालवणातील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर मालवण शहरात पोलिसांनी संचलन केले. 

गोवा राज्यातील तीन पर्ससीन नौकांना एलईडी मासेमारी करताना मालवणातील मच्छीमारांनी पकडले. यासाठी जोसेफ नरोना याची नौका वापरण्यात आली होती. सदर नौका पोलिसांनी जप्त करून नौकेवरील सात खलाशांना बुधवारी सायंकाळी चौकशी ताब्यात घेतले होते. गुरुवारी करकाप्पा बसप्पा मडीवार (50, रा. बोधागुंबी बळगिरी ता. कलबुर्गा, कर्नाटक), मनी गणपती मेस्त्री (40, कुलकिर ता. होनावळ, कारवार), उमेश मुरलीधर आडविलकर (37, गावडे- आंबेरी, रत्नागिरी), विकास कृष्णा मयेकर (49, काळबादेवी दत्तमंदिर, रत्नागिरी), संत्या चणप्पा वसबावे (22, इहगील, ता. एलबुर्गा, कर्नाटक), परसप्पा येरप्पा बुरकार (40, नेरेगरह ता. अर्णोरा), हनुमंताप्पा मुरगप्पा बुगार (50, मंडलगिरी ता. एलबुर्गा, कर्नाटक) या पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले. 

महेश देसाई राणेंच्या बंगल्याबाहेरून ताब्यात

मालवणातील मच्छीमारांच्या आंदोलनात सहभागी असलेले मच्छिमार कार्यकर्ते महेश देसाई हे आज मच्छीमारांच्या समवेत नारायण राणे यांच्या निवासस्थानी बैठकीला जात होते. यावेळी पोलिसांच्या पथकाने देसाई याना राणेंच्या बंगल्याबाहेरून ताब्यात घेतले. पोलिसांच्या धरपकड कारवाईमुळे मच्छीमारात घबराट निर्माण झाली होती. 

त्या नौकांवर आज सुनावणी

स्थानिक मच्छीमारांनी पकडलेल्या तीन नौका सहाय्यक मत्स्य विभागाने पंचनामा करत ताब्यात घेतले. सदर नौका अनिश्‍चित कालावधीसाठी अवरुद्ध करण्याबाबत मत्स्य आयुक्‍त श्रीकांत वारुंजीकर यांनी गुरुवारी तहसीलदार कार्यालयात कारवाईचा प्रस्ताव सादर केला असून यावर शुक्रवार सुनावणी होणार आहे.

मासेमारी बंद उत्स्फूर्त

अनधिकृत मच्छीमारी करणारे गोवा येथील ट्रॉलर स्थानिक मच्छीमारांनी पकडल्यानंतर पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांवर गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांच्या कारवाई विरोधात मालवणातील किनारपट्टीवरील मच्छीमारांकडून तीव्र असंतोष व्यक्‍त करण्यात येत होता. पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ काल मच्छीमारांनी अघोषित बंदची हाक दिली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी 11 वा. नंतर मच्छीमारी व मासळी विक्री बंद ठेऊन इतर मासेमारी व्यवहारही बंद ठेवण्यात आले होते. मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला.

कर्नाटकातील ट्रॉलर्सची पुन्हा घुसखोरी!

गोवा येथील ट्रॉलर स्थानिक मच्छीमारांनी पकडल्यानंतर स्थानिक मच्छीमारांवर पोलिस प्रशासनाकडून झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज मालवण किनारपट्टी भागातील सर्व मच्छीमारांनी बंदची हाक दिली. या बंदचा फायदा मलपीतील हायस्पीड ट्रॉलर्संनी घेतला असून दुपारनंतर त्यांनी घुसखोरी करत मासेमारी केली. त्यामुळे मच्छीमार अधिकच आक्रमक बनले आहेत. याकडे मत्स्य व्यवसाय विभागाचे दुर्लक्ष झाल्याने मच्छीमारांतून संताप व्यक्त होत आहे. 

मच्छीमारांचा परराज्यातील हायस्पीड, पर्ससीन व प्रकाश झोतातील मासेमारीविरोधात संघर्ष सुरू आहेत. यात दोन दिवसापूर्वी गोव्यातील ट्रॉलर्स पकडल्यानंतर स्थानिक मच्छीमारांवर गुन्हे दाखल झाले. या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी मच्छीमारांनी मासेमारी व मासळी विक्री बंद ठेवली. सर्व मच्छीमारी ट्रॉलर्स बंदरात उभे करून ठेवण्यात आले आहेत. याच संधीचा फायदा मलपीतील हायस्पीड ट्रॉलर्सनी घेत जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासळीची लूट करण्यास सुरवात केली आहे. सायंकाळच्या वेळेस मलपीतील ट्रॉलर्स येथील समुद्रात मासेमारी करत असल्याचे दिसून स्थानिकांना दिसून आले. एकीकडे संघर्ष सुरू असताना मलपीतील ट्रॉलर्सनी पुन्हा अतिक्रमण केल्याने पारंपरिक मच्छीमार आक्रमक बनले आहेत. त्यामुळे समुद्रातील हा संघर्ष आता आणखीनच वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.