Thu, Jul 18, 2019 16:32होमपेज › Konkan › मालवणातील तीन मच्छीमारांकडून अवैध एलईडी मासेमारी!

मालवणातील तीन मच्छीमारांकडून अवैध एलईडी मासेमारी!

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 08 2018 9:51PMमालवण:  प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पर्ससिननेट बरोबरच अवैध प्रखर प्रकाशझोतातील मच्छिमारी सुरू असून यात येथील तीन मत्स्य उद्योजकांचा सहभाग असल्याचे आ. वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसायचे सहआयुक्‍त राजेंद्र जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले. संबंधितांची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

दरम्यान येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयासाठी सुचविलेल्या कन्याशाळा  इमारतीची पाहणी करून ही जागा निश्‍चित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना आ. नाईक यांनी  मत्स्य अधिकार्‍यांना दिल्या. उपतालुकाप्रमुख तथा जि. प. सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गणेश कुशे, दिलीप घारे, पंकज सादये, बाबी जोगी यांच्यासह पारंपरिक मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दित स्थानिक मच्छिमाराना प्राधान्य दिले पाहिजे. असे केल्यास अक्रियाशील भांडवलदार बोट मालकांचे अतिक्रमण दूर होऊन मच्छिमारामधील बराचसा  संघर्ष संपुष्टत येईल. त्यामुळे मत्स्यव्यावसाय विभागाने स्थानिक क्रियाशील मच्छिमार ही संकल्पना राबवावी, अशी मागणी सहआयुक्‍त राजेंद्र जाधव यांच्या जवळ केली.

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सध्या प्रखर झोतातील मासेमारी सुरू आहे. या मासेमारीला केंद्र शासनाने बंदी घातली असतानाही मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे मच्छीमारांनी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेत मालवणातीलच तीन मत्स्य उद्योजकांकडून प्रखर झोतातील मासेमारी केली जात असून त्यांची नावे आ. नाईक यांनी सहआयुक्‍त श्री. जाधव यांना दिली.  संबंधितांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची अशी मागणी आ. नाईक यांनी केली.

डिसेंबर महिन्यानंतर पर्ससीननेट मासेमारीस बंदी असतानाही आचरा, निवती-वेंगुर्ले येथे सध्या मिनी पर्ससीननेटद्वारे मासेमारी सुरू असल्याचे पारंपरिक मच्छीमारांनी निदर्शनास आणून दिले. यावर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले. यावर सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्‍त प्रदीप वस्त यांनी पंधरवड्यापूर्वी अनधिकृत मिनी पर्ससीननेटच्या साहाय्याने मासेमारी करणार्‍या आठ ते दहा जणांवर कारवाई करण्यात आली असून यावरील दंडात्मक कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले. मत्स्य व्यवसाय विभागाकडे गस्तीसाठी हायस्पीड नौका नसल्याने कारवाईची समस्या निर्माण होत  असल्याचे स्पष्ट करण्यात आले.  यावर हायस्पीड नौकेसाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ सादर करण्याची सूचना आ.नाईक यांनी दिली. 

मत्स्य व्यवसाय कार्यालयासाठी आठ जागा मच्छीमारांनी सुचविल्या होत्या. त्यानुसार शहरातील कन्याशाळा येथील जागेची  आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली.  मत्स्य व्यवसाय सहआयुक्‍त राजेंद्र जाधव  व अधिकारी उपस्थित होते. जागा निश्‍चितीची कार्यवाही  करून आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आ. नाईक यांनी  अधिकार्‍यांना केल्या.

बदनामी नको, बदली करा

येथील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्‍त प्रदीप वस्त यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी मच्छीमारांनी काही दिवसांपूर्वी केली होती. याप्रकरणी श्री. वस्त यांनी आपण येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यापासून गेली अनेक वर्षे रखडलेली कामे मार्गी लावली आहेत. मच्छीमारांना नेहमीच सहकार्य केले आहे. त्यामुळे आपली बदनामी न करता बदली करा असे स्पष्ट केले.

मच्छीमारांबद्दलची प्रतिमा बदलावी

येथील मच्छीमार अवैधरित्या होणार्‍या मासेमारीवर कारवाई होत नसल्यानेच सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. ते केवळ अधिकार्‍यांना धारेवर धरण्यासाठी आक्रमक होत नसून पोटतिडकीने आपल्या भावना व्यक्‍त करत आहेत.  अवैध मासेमारीवर कारवाई झाल्यास मच्छीमार तुम्हाला सहकार्य करतील. त्यामुळे मत्स्य व्यवसाय अधिकार्‍यांनी मच्छीमार केवळ भांडण्यासाठी येतात, अशी  प्रतिमा  बदलणे गरजेचे असल्याचे आ. नाईक यांनी स्पष्ट केले. 

मेढा-राजकोट मत्स्यजेटीचे काम लवकरच

मेढा राजकोट येथे नवीन मत्स्यजेटी मंजूर झाली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच या कामाला सुरवात होणार आहे. हे काम मार्गी लावल्यास येथील मच्छीमारांना आपल्या नौका लावण्यासाठी सुसज्ज अशी जेटी उपलब्ध होणार असून हे काम अखेर मार्गी लागल्याने स्थानिक मच्छीमारांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले.