Tue, Jun 18, 2019 21:12होमपेज › Konkan › रत्नागिरीत मासळी प्रक्रिया उद्योग : प्रभू

रत्नागिरीत मासळी प्रक्रिया उद्योग : प्रभू

Published On: Jul 22 2018 10:35PM | Last Updated: Jul 22 2018 10:18PMवेंगुर्ले (शहर वार्ताहर)

मच्छीमार हा देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, हा मच्छीमार आज विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. या समस्या सोडविण्याबरोबरच सर्वसामान्य पारंपरिक मच्छीमारांच्या विकासासाठी केंद्र शासनाने काही योजना  प्रस्तावित केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून लवकरच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मासळी प्रक्रिया उद्योग उभारण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याचबरोबर वेंगुर्ले, शिरोडा व निवती बंदरांचा मच्छीमारी व पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे, अशी महिती केंद्रीय वाणिज्य व हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. वेंगुर्ले येथे आयोजित मच्छीमार मेळाव्यात ते बोलत होते.

पालकमंत्री दीपक केसरकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, आधुनिक रापण संघाचे अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ना. प्रभू म्हणाले, देशाच्या किनारपट्टीचे रक्षण करण्यात मच्छीमारांचे योगदान महत्त्वाचे आहे.  मासळी प्रक्रिया हा एक मोठा उद्योग आहे. हा उद्योग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सुरू झाल्यास स्थानिक पारंपरिक मच्छीमारांचे उत्पन्‍न वाढण्यास मदत होणार आहे. मच्छीमारांना संरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यांचे जीवन सुधारले पाहिजे म्हणून  मच्छीमार आणि मासळी उद्योगाला ऊर्जितावस्था येण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये एकही मोठे बंदर नाही. सध्या जी बंदरे आहेत, ती सुरक्षित बंदरे यात येत नाहीत. त्यामुळे येथे पर्यटनाचाही विकास होऊ शकलेला नाही. भविष्यात ही परिस्थिती बदललेली दिसेल. बंदरांचा विकास व्हावा, यासाठी आपण  स्वतः लक्ष घातले असल्याचे ना. प्रभू यांनी सांगितले.