Thu, Dec 12, 2019 08:52होमपेज › Konkan › पुणे- मुंबईतून येणारे मत्स्य खवय्ये नाराज

मत्स्यदुष्काळ!

Published On: May 19 2019 1:33AM | Last Updated: May 19 2019 1:33AM
शृंगारतळी : वार्ताहर

मे महिन्याचा सुट्टीचा हंगाम सुरू आहे. गुहागरकडे शेकडो पर्यटक धाव घेत आहेत. मात्र, या वर्षी खास करून मासे खाण्यासाठी गुहागरला येणार्‍या पर्यटकांची निराशा झाली आहे. किनारपट्टीवर मासेमारीच होत नसल्याने मासे कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.

मे महिन्याच्या या हंगामामध्ये शेकडो पर्यटक गुहागरमध्ये येतात. तवसाळपासून वेलदूरपर्यंत समुद्र किनारपट्टीवर पर्यटनस्थळे आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र तसेच पुण्या-मुंबईहून दररोज पर्यटकांच्या शेकडो गाड्या गुहागरकडे येत आहेत. समुद्रात पोहण्याचा आनंद घेतानाच येथील माशांवर ताव मारण्याची या पर्यटकांची इच्छा या वर्षी अपुरी राहत आहे. खुद्द गुहागरच्या हॉटेलमधून चविष्ट माशांच्या डिश अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. संपूर्ण गुहागर किनारपट्टीवरच माशांचा तुटवडा भासत असल्याने पर्यटकांच्या पसंतीचे बोंबिल, पापलेट, सुरमई, रावस, कोळंबी व बांगडा हे चविष्ट मासे मच्छी मार्केटमध्येच दिसेनासे झाले आहेत. मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात या प्रकारामधील मासळी मिळत नसल्याने तेही निराश झाले आहेत. परिणामी, काही ठिकाणी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मच्छीमारांनी होड्या शाकारण्यास सुरुवात केली आहे.

तालुक्यामध्ये लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी तसेच सुट्टीवर म्हणून अनेक चाकरमानी गावाकडे परतले आहेत. या सर्वांचे जेवणातले आवडते खाद्य म्हणजेच मासे असून या वर्षी माशांच्या दुष्काळाने चाकरमान्यांची मासे खाण्याची हौस अपुरी राहिली आहे.

दि. 1 जून ते 31 जुलै या शासनाच्या मासेमारी बंदी काळाचा तालुक्यातील रहिवाशांवर फारसा परिणाम होणार नाही. कारण पावसाळ्यात नदीतील मासे चढणीला लागतात. ते पकडण्याची परंपरा गावागावात आहे.  नदीनाले व शेतामध्ये सापडणारे विविध प्रकारचे खेकडे व मासे येथील खवय्यांची भूक भागविण्यासाठी पुरेसे ठरतात.

1 जूनपासून मासेमारी बंद

महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमानुसार 1 जूनपासून यांत्रिकी पद्धतीच्या मासेमारीचा बंदीकाळ सुरू होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 4,300 नोंदणीकृत मच्छीमार बोटी किनार्‍यावर येणार आहेत. या काळात यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करताना आढळल्यास त्या नौकेवर आणि नौका मालकावर कारवाई करण्यात येणार आहे. बंदीच्या कालावधीत एखादी नौका मासेमारी करायला गेली आणि तिला अपघात झाल्यास शासन तिला कोणतीही नुकसान भरपाई देणार नाही, असे  प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.