होमपेज › Konkan › नाम फाऊंडेशनचा जिल्ह्यात पहिला उपक्रम

नाम फाऊंडेशनचा जिल्ह्यात पहिला उपक्रम

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 12 2018 10:54PMदेवरुख :  प्रतिनिधी

नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाऊंडेशन’ने रत्नागिरी जिल्ह्यात विकासाचे पहिले पाऊल संगमेश्‍वर तालुक्यातील मौजे असुर्डे गावात टाकले आहे. मौजे असुर्डे गावातील 120 कुटुंबांनी गावच्या नाल्यात श्रमदान करुन खोलीकरण, रुंदीकरण करण्याचा प्रारंभ चिपळुण संगमेश्‍वरचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी ‘नाम फाऊंडेशन’चे कोकण विभाग प्रमुख समीर जानवलकर, तालुका प्रतिनिधी भगवतसिंह चुंडावंत, कार्यकर्ते शैलेश जाधव, चिपळूण कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी, पत्रकार प्रमोद हर्डीकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी आमदार सदानंद चव्हाण यांनी ‘नाम फाऊंडेशन’ने मौजे असुर्डे ग्रामस्थांना चांगली ऊर्जा दिली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांनी घरपट पैसे काढून, श्रमदानाची तयारी केली आहे. हे श्रमदान भावी पिढीचा पाण्याचा प्रश्‍न सोडवणारे ठरणार आहे. आमदार या नात्याने आपण या पाणी प्रश्‍नासाठी सहकार्य करणार असून या गावासाठी लागणारा रस्ताही या वर्षी पूर्ण केला जाणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. ग्रामस्थांची एकी पाहून आपण भारावलो असल्याचेही आमदारांनी कबूल केले.

‘नाम फाऊंडेशन’ने जिल्ह्यात पहिले पाऊल संगमेश्‍वर तालुक्यात मौजे असुर्डे गावात टाकले आहे, असे सांगत कोकण विभाग प्रमुख समीर जानवलकर यांनी सुमारे पाच लाख खर्चाच्या या पहिल्या योजनेसाठी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे स्पष्ट केले. दुसरी योजना विघ्रवली गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राबवली जाणार आहे, असे जानवळकर म्हणाले.

या कार्यक्रमासाठी अभिनेते मकरंद अनासपुरे असुर्डे गावात आज येणार होते. मात्र, लातूर येथील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या मुलांच्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ते गेले असल्याचे तालुकाप्रमुख भगवतसिंह चुंडावंत यांनी सांगितले. मकरंद अनासपुरे यांनी मौजे असुर्डे ग्रामस्थांची प्रशंसा केलेला अनासपुरे यांचा संदेशही चुंडावंत यांनी वाचून दाखवला. दि. 20 रोजी मकरंद अनासपुरे असुर्डे गावी येणार असल्याचे सांगण्यात आले. चिपळूण कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी उपस्थित ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रत्येक कुटुंबाने स्वावलंबी बनावे, असे आवाहन केले.

‘नाम’च्या माध्यमातून व ग्रामस्थांच्या श्रमदानातून पर्याची खोली व उंची वाढवण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी आपल्या जमिनी रस्त्यासाठी, रुंदीकरणासाठी दिल्या आहेत. यामध्ये शांताराम मनवे, जानु शिवगण, तुकाराम पाताडे, लक्ष्मण मनवे, नथुराम मनवे, आनंद मनवे यांच्यासह अनेकांचा गौरव करण्यात आला.  संदीप रहाटे यांनी या कामासाठी यांत्रिक सामुग्री उपलब्थ करुन दिली आहे. पाणी प्रश्नासाठी गावातील सर्वच ग्रामस्थ एकवटले आहेत. रामचंद्र कुळ्ये, अनंत लाड, प्रमोद मनवे, सुनील मनवे, शैलेश मसुरकर, रुपेश पाताडे, दिगू पाताडे, विश्‍वनाथ पाताडे यांचेही योगदान लाभले.

‘नाम फाऊंडेशन’ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे दोन प्रकल्प सुरु आहेत. रायगड जिल्ह्यात दोन ठिकाणी कामे सुरु आहेत. मौजे असुर्डे येथील हा नवा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प असून नंतर विघ्रवली येथे काम सुरु होणार आहे. असुर्डे काम आठ दिवसांत पूर्ण होणार आहे.  यासाठी पाच लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.