Tue, Jun 18, 2019 23:08होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : आगीत ७५० काजू कलमे भस्मसात

सिंधुदुर्ग : आगीत ७५० काजू कलमे भस्मसात

Published On: Dec 31 2017 1:29AM | Last Updated: Dec 30 2017 11:26PM

बुकमार्क करा
बांदा : वार्ताहर

  इन्सुली-गांवकरवाडी राईची शेळ येथील काजू बागायतीला  हायव्होल्टेज केव्हीलाईनच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे 750 काजू कलमे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात रामचंद्र चराटकर,सदानंद कोलगांवकर, दिलीप सावंत यांच्या सुमारे एक एकर जागेतील काजू कलमे जळून भस्मसात झाली.शुक्रवारी भरदुपारी लागलेली ही आग विझवण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उन्हाचा कडाका असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने हे प्रयत्न तोकडे पडले. ऐन हातातोंडाशी आलेले काजूचे उत्पन्न महापारेषणच्या चुकीमुळे जळून गेल्याने शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

इन्सुली तलाठी भारती गोरे यांनी शनिवारी दुपारी पंचनामा करीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले. उपस्थितांनी महापारेषणच्या बाबतीत नाराजी व्यक्‍त केली व संबंधित शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली.

   इन्सुली येथील गांवकरवाडी राईचीशेळ येथे रामचंद्र चराटकर,सदानंद कोलगांवकर,दिलीप सावंत यांची काजू बागायती आहे. यातील सदानंद कोलगांवकर आणि काका चराटकर हे नेहमीप्रमाणे काजू बागायतींमध्ये काम करून दुपारी जेवणासाठी घरी गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांना नजीकच्या शेतकर्‍यांनी तुमच्या काजू बागायतीला आग लागल्याची माहिती दिली. शेतकरी व स्थानिकांनी आग विझवण्याचे मोठे प्रयत्न केले. शेती पंपाच्या सहाय्याने दहा जणांनी आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्न केला. मात्र, आगीच्या रौद्ररूपापुढे हे प्रयत्न अपुरे पडले.या आगीत रामचंद्र चराटकर 450 काजू कलमे,पाण्याची पाईपलाईन,आंबा,सागाची झाडे जळाली. सदानंद कोलगांवकर यांची 100 काजूची कलमे, पाईपलाईन, सागाची झाडे तर दिलीप सावंत यांची 200 काजू कलमे, पाईपलाईन जळून खाक झाली. या सर्वांचे मिळून पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी अजय गांवकर, लक्ष्मण चराटकर, साईश नाईक, तेजस पालव, आशिष गांवकर, रुपेश पालव, शुभांगी नाईक, मनीषा चराटकर, उर्मिला चराटकर, आनंद चराटकर, गजानन गांवकर,संतोष मेस्त्री यांनी सहकार्य केले.