Thu, Jan 30, 2020 00:04होमपेज › Konkan › तळेरेत कापड दुकानाला आग

तळेरेत कापड दुकानाला आग

Published On: Jan 16 2018 2:11AM | Last Updated: Jan 15 2018 9:47PM

बुकमार्क करा
नांदगाव : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गालगत तळेरे बाजारपेठ येथील लक्ष्मी क्लॉथ सेंटर या कापड दुकानाला सोमवारी पहाटे शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने पूर्ण दुकान खाक झाले. यामध्ये सुमारे 10 लाख 65 हजारांचे नुकसान झाले आहे. 

मुंबई-गोवा महामार्गालगत तळेरे बाजारपेठेतील बांदिवडेकर कॉम्पलेक्सच्या तळमजल्यावर रोहिदास विष्णू बांदिवडेकर यांचे लक्ष्मी क्लॉथ सेंटर हे कापड दुकान आहे. रविवारी रात्री ते  कामगारांसोबत दुकान बंद करून घरी गेले. सोमवारी सकाळी   ते व कामगार शेलार दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानातून धूर येत असल्याचे  निर्दशनास आले. त्यांनी प्रसंगावधान बाळगत प्रथम पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कपड्यांनी पेट घेतल्याने आगीचा उडालेला भडका पाण्याने आटोक्यात येत नव्हता. आगीचे रौद्ररूप पाहून त्यांनी सर्वांना फोनद्वारे संपर्क करत घटनास्थळी बोलावले. 

आगीचे लोळ दुकानाबाहेर
दुकानात असणारे कापड व फर्निचरने  पेट घेतल्याने आगीचे लोळ दुकानाच्या बाहेत येत होते. याच दरम्यान शेजारीलपोकळे यांच्या बोअरवेल व टेम्पोने पाणी आणत आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे भडका वाढतच होता. तब्बल एका तासानंतर ग्रामस्थाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत या आगीत दुकानातील कपडे, फर्निचर जळून खाक झाले होते. यावेळी तळरे येथील उल्हास कल्याणकर, शुभम खटावकर, शरद वायंगणकर, आप्पा मेस्त्री, अमोल सोरप, बाळा जठार, गणेश बांदिवडेकर, राजकुमार तळेकर, शिवम खटावकर, दिलीप तळेकर, नवीन खटावकर, अप्पी वरुणकर, बाजारपेठ मित्रमंडळ, दिलीप तळेकर मित्रमंडळ, व्यापारी,टेम्पो व रिक्षा संघटना, ग्रामस्थ यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आग आटोक्यात आल्यावर व सर्व जळून खाक झाल्याची परिस्थिती पाहताबांदिवडेकर यांना धक्‍का बसला.बांदिवडेकर यांनी बँकेचे  पाच लाखांचे कर्ज काढून व्यवसाय उभारला होता.  
तलाठी दीपक पावसकर, महावितरणचे श्री.म्हस्के,पोलिस गणेश भोवड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. आगीत 9 लाखांचे कापड, 1 लाखाचे फर्निचर, 65 हजारांची रोकड असे मिळून 10 लाख 65 हजार रोकड व ऐवज भस्मसात झाल्याची माहिती दुकान मालक श्री.बांदिवडेकर यांनी दिली. 
सुदैवाने मोठा अनर्थ टळला 
सर्वांनी मिळून आग आटोक्यात आणल्याने  मोठी हानी टळली. कारण या बिल्डींगमध्ये आग लागलेल्या बाजूलाच आणखी एक दुकान, एक एटीएम व पहिल्या मजल्यावर बँक ऑफ इंडियाची शाखा होती.आगीची झळ या दुकानांपर्यत न पोहचल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. यावेळी बांदिवडेकर यांना स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी, ग्रामस्थ यांनी भेट घेत झालेल्या प्रकाराची माहिती घेत धीर दिला.