Sun, Mar 24, 2019 06:36होमपेज › Konkan › कुडाळ बाजारपेठेत ‘अग्‍नितांडव’

कुडाळ बाजारपेठेत ‘अग्‍नितांडव’

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:03PM

बुकमार्क करा

कुडाळ ः प्रतिनिधी
कुडाळ गांधी चौक एस.टी. स्टॅण्ड नजिकच्या बाजारपेठेत भोगटे यांच्या फटाके दुकानाला  लागलेल्या आगीत लगतची अन्य तीन दुकाने बेचिराख झाली तर लगतच्या दोन दुकानांसह इमारतीचे  मोठे नुकसान झाले.  फटाक्याच्या आवाजासह  सिलिंडरचा स्फोट झाल्याने कुडाळ शहर हादरुन गेले. रात्री उशिरा आग आटोक्यात आली. सोमवारी  सकाळपर्यंत आग घुमसत राहिल्याने  अग्‍निशामक बंबाद्वारे  आग  विझविण्याचे प्रयत्न  सुरू होते.

कुडाळ गांधी चौकासमोरील बाजारपेठेत रस्ता दुतर्फा दाटीवाटीने दुकाने आहेत. याच मार्गावर एसटी स्टॅण्डलगत असलेल्या भोगटे यांच्या फटाक्याच्या दुकानाला पहिली आग लागली. सध्या कुडाळमध्ये कृषि महोत्सव सुरू असल्याने शहरातील बरीचशी मंडळी महोत्सवाला गेली होती. 10.20 च्या दरम्यान भोगटे यांच्या फटाके दुकानात  फटाके फुटत असल्याचा आवाज झाला आणि काही वेळातच आगीच्या मोठ्या ज्वाळा इमारतीमधून बाहेर पडू लागल्या. हे अग्‍नीतांडव पाहून  लगतच्या इमारतीमधील मंडळींनी आरडाओरड सुरू केली आणि काही क्षणात  सर्व कुडाळवासीय घटनास्थळी जमा झाले. दरम्यान  एमआयडीसीमधील अग्‍निशामक बंबाद्वारे  आग विझविण्याचे काम सुरू झाले. मात्र, फुटणारे फटाके व सोबत सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. यामुळे पसरलेल्या आगीने लगतची चप्पल, कॉस्मेटीक आणि कोल्ड्रींक्स अशी चार दुकाने कवेत घेतली.

आगीचे रौद्र रूप पाहून  नागरिकांनी प्रसंगावधान राखून चारही दुकानाच्या दोन्ही बाजूकडील किराणा माल व कोल्ड्रिंक्स दुकाने तत्परतेने खाली केली.  दरम्यान वेंगुर्ले, कणकवली व मालवण येथील बंबही मदतीसाठी धावून आले. वीज पुरवठा  खंडित झाल्याने बाव येथील एस.पी. सामंत यांचे जनरेटर आणून  विजेची व्यवस्था केली. काही ठेकेदारांनी आपले पाण्याचे टँकर मदतीसाठी पाठवून दिल्याने त्या टँकरमधून आणलेले पाणी बंबात सोडून अग्‍निशामक बंबाच्या पाण्याची गरज भागविण्यात आली. मात्र, पहाटेपर्यंत  आगीचे तांडव सुरूच होते.  सोमवारी सकाळीही आग धुमसत राहिल्याने अग्‍निशामक बंबाला पाचारण करून आगीवर पूर्णतः निमंत्रण आणले. या चार दुकानाच्या दोन्ही बाजूला  तीन मजली आरसीसी इमारत असल्याने दोन्ही बाजूला आग जावू शकली नाही. मात्र, त्या दोन्ही इमारतीच्या टेरेसवर आगीच्या ज्वाला गेल्याने छप्पराचे प्लास्टीक जळून गेले तसेच त्या इमारतीच्या भिंतींना तडे गेले. भोगटे यांचा एक कामगार  या आगीत सापडला होता. मात्र, तो बालंबाल वाचला. पोलिस निरीक्षक अविनाश भोसले यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. 

उपनिरीक्षक एस.के. पवार, सहाय्यक निरीक्षक एन.एन. कदम, हे.कॉ. आर.एन. जाधव, आशिष किनळेकर, विलास भोगले, पी.डी.मोरे आदी उपस्थित होते. कुडाळ शहरात  7 वर्षापूर्वी अशाच प्रकारचे अग्‍नितांडव झाले होते. त्यावेळी  एका व्यक्‍तीचा मृत्यू झाला होता, त्या घटनेची आठवण उपस्थितांना या घटनेदरम्यान 
झाली.