होमपेज › Konkan › डिंगणे माळरानावर अग्‍नितांडव!

डिंगणे माळरानावर अग्‍नितांडव!

Published On: Jan 17 2018 1:58AM | Last Updated: Jan 16 2018 9:47PM

बुकमार्क करा
बांदा : वार्ताहर

डिंगणे-धनगरवाडी परिसरात मंगळवारी सकाळी आगडोंब उसळला. या अग्‍नितांडवात सुमारे 350 एकरहून अधिक क्षेत्रावरील काजू बागायती जळून खाक झाल्या. सकाळी लागलेली ही आग सायंकाळी उशिरापर्यंत धुमसत होती. आग विझविण्यासाठी शेकडो ग्रामस्थ शर्थीचे प्रयत्न करीत होते. दरम्यान, अग्‍निशमन बंब उशिराने दाखल झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्‍त केली. ही आग लगतच्या डेगवे व मोरगाव गावांच्या सीमेपर्यंत पोहोचल्याने नुकसानीचा आकडा एक कोटींच्या घरात गेला आहे. 

गतवर्षीच्या अग्‍नितांडवाची पुनरावृत्ती... 

ऐन काजू हंगामात काजू कलमे खाक झाल्याने शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. गतवर्षी देखील याच माळरानाला आग लागून शेकडो एकर काजू बागायती खाक झाली होती. त्यात धनगरवाडा येथील बाळू शिंदे, कृष्णा शिंदे व शिंदे यांच्या मालकीच्या मेंढ्याला गोठ्याला आग लागून 95 मेंढ्या या गोठ्यासह जळून खाक झाल्या. तसेच ती आग शिंदे यांच्या घरातही शिरली होती.मंगळवारी सकाळी धनगरवाडी माळरानावर आग लागल्याचे निदर्शनास आले. वाळलेल्या गवतामुळे आगीचा भडका उडाला. स्थानिक शेकडो नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. मात्र आग भडकल्याने या आगीत शेतकर्‍यांची काजू, आंबा, बांबू व सागवानाची हजारो झाडे जळून खाक झाली.

या माळरानावर परिसरातील शेतकर्‍यांनी गवताच्या गंजी रचून ठेवल्या होत्या. त्या सर्व गंजी या आगीत बेचिराख झाल्या. तसेच या गवतामुळे आग भडकण्यास सहाय्य झाले. आगीची माहिती मिळताच डिंगणे व डेगवे गावातील शेकडो ग्रामस्थांनी धनगरवाडीच्या दिशेने धाव घेतली व आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र शेकडो एकर क्षेत्रात आग पसरल्याने आग विझविणे अशक्य झाले. बांदा पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेत मदत केली. आगीने संपूर्ण परिसराला वेढल्याने सावंतवाडी नगरपालिकेच्या बांबला पाचारण केले.

डिंगणे येथील एकनाथ सावंत, सुबोध सावंत, महादेव सावंत, विलास सावंत, संतोष सावंत, भास्कर सावंत, नितीन सावंत, शशिकांत पोखरे, महेश पोखरे, अवधूत शिरोडकर यांच्यासह अनेक शेतकर्‍यांच्या काजू बागायती आगीच्या भक्ष्यस्थानी  पडल्या. सुमारे 350 एकरहून अधिक क्षेत्र भक्ष्यस्थानी पडल्याने 1 कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. याठिकाणी लागलेल्या आगीचे धुराचे लोट बांदा शहरातूनही दिसत होते.