Mon, Apr 22, 2019 16:35होमपेज › Konkan › देवरूखमधील भारत बेकरीला भीषण आग

देवरूखमधील भारत बेकरीला भीषण आग

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 10:35PMदेवरूख : प्रतिनिधी

देवरूख बसस्थानकासमोरील हनिफ अबास हरचिरकर यांच्या भारत बेकरीला सोमवारी पहाटे चार वाजता भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण बेकरी बेचिराख झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे. शेजारील दोन वडापाव सेंटरना या आगीची झळ बसली. महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा करून 9 लाख 50 हजारांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे.

सोमवारी पहाटे चार वाजता संतोष हेगिष्टे रिक्षा घेऊन स्टँँडवर येत असताना त्याला भारत बेकरीमधून धूर येताना दिसला. ताबडतोब संतोषने प्रसंगावधान दाखवून बेकरी मालक हनिफ हरचिरकर यांना घरी जाऊन घेऊन आला. बेकरीत आग लागल्याचे लक्षात येताच हरचिरकरांनी युयुत्सू आर्ते, मिहिर आर्तेंना कल्पना दिली.अण्णा बेर्डे, बाबा जाधव यांनीही फोन केले. पहाटेची अंधारी वेळ व पाऊस यामुळे मदतीत अडथळे आले. यातच आत आग वाढत गेली.

पाण्याची कमतरता भासली. भगवतसिंह चुंडावत यांनी दुकानातील जनरेटर बाहेर आणून समोरील विहिरीतील पाणी मिळवले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. बाजारपेठ व्यापारीवर्ग, राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमी, देवरूख नगरपंचायत नगरसेवक, कर्मचारी, रिक्षाचालक व नागरिकांनी मदतकार्यात पुढाकार घेतला. शैलेश सार्दळ यांच्या जेसीबीने दुकानचे शटर व पत्रे काढले. मात्र, तोपर्यंत आतील बेकरी माल, शीतपेये, तीन मोठे फ्रीज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा करुन 9 लाख 50 हजारांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे. तलाठी बजंरंग चव्हाण यांनी हा पंचनामा केला. याच बेकरीच्या दोन्ही बाजूला असणार्‍या वडापावची दुकानांनाही झळ पोहचली. यात शंकर भालेकर यांच्या दुकानाचे 65 हजार 900 रुपये तर प्रकाश भायजे यांचे 51 हजार 800 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे.

देवरुख नगरपंचायतीने अग्नीशमन यंत्रणा उभारणे गरजेचे 

देवरुख शहराची वाढती लोकसंख्या व वाढती बाजारपेठ लक्षात घेता व वारंवार घडणार्‍या आगीच्या घटना लक्षात घेता देवरुख नगरपंचायतीने अग्नीशमन यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. बेकरीला आग लागताच रत्नागिरी नगरपरिषदेला बंबासाठी फोन लावले गेले. हा बंब तेव्हा जयगड येथे असल्याचे कळले.जयगडहून हा बंब देवरुखला सकाळी 7.30 ला पोहचला. तोपर्यंत ही आग संपूर्ण बेकरी गिळंकृत करुन शमली होती. ‘आग रामेश्‍वरी, बंब सोमेश्‍वरी’अशीच अवस्था पहायला मिळाली.