Mon, Aug 19, 2019 00:40होमपेज › Konkan › कुणकवण येथे घर बेचिराख

कुणकवण येथे घर बेचिराख

Published On: Jan 29 2018 11:22PM | Last Updated: Jan 29 2018 11:22PMदेवगड : प्रतिनिधी

शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे देवगड-कुणकवण येथील रघुनाथ भिकाजी तावडे व केशव भिकाजी तावडे यांच्या मालकीचे घर बेचिराख झाले. ही दुर्घटना  कुणकवण येथे 27 जानेवारी रोजी रात्री घडली. या दुर्घटनेमध्ये घराचे सुमारे 17 लाखांचे नुकसान झाले.

देवगड तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, कुणकवण येथे रघुनाथ भिकाजी तावडे व केशव भिकाजी तावडे यांच्या सामाईक मालकीचे घर आहे. या दोन्ही घरांतील सर्व मंडळी नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत राहात असल्याने घर एरवी बंद असते. 26 जानेवारी रोजी रघुनाथ तावडे यांचा मुलगा मधुकर तावडे कार्यक्रमानिमित्त गावी कुणकवण येथे आला होता. ते एकटेच गावी 
आल्यामुळे 27 जानेवारी रोजी सायंकाळी घर बंद करून बंदरवाडी येथे मित्राच्या घरी झोपण्यासाठी गेले. दुसर्‍या दिवशी सकाळी घराकडे आल्यानंतर  घर बेचिराख झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर तलाठी बडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मधुकर तावडे यांनी दिलेल्या जबाबात शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराचे तसेच छपराचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. या घराच्या आजूबाजूला जवळपास अन्य घरे नसल्यामुळे ही दुर्घटना वेळीच लक्षात आली नाही. 
दुर्घटनेमध्ये घरांचे सुमारे 17 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. जळीतग्रस्त कुटुंबीय राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे भाऊबंद आहेत.