Fri, Apr 26, 2019 09:53होमपेज › Konkan › मंडणगडमध्ये वणव्यात  होरपळून शेतकर्‍याचा मृत्यू 

मंडणगडमध्ये वणव्यात  होरपळून शेतकर्‍याचा मृत्यू 

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:43PMमंडणगड  : प्रतिनिधी 

काजूच्या बागेत भडकलेला वणवा  विझवताना तालुक्यातील मौजे टाकवली येथील 75 वर्षीय शेतकरी काशिनाथ गौराजी जाधव यांचा होरपळून  मृत्यू झाला आहे. 

टाकवली येथील शेतकरी काशिनाथ जाधव हे आपल्या टाकवली येथील काजूच्या बागेची साफसफाई करण्यासाठी सकाळी गेले होते. सकाळी 10 वा. च्या सुमारास  त्यांच्या   काजूच्या बागेेत अचानक वणवा लागल्याने काजूची झाडे  होरपळून जातील म्हणून त्यांनी तो विझवण्याचा प्रयत्न केला असता अचानक वणव्याची आग भडकून काशिनाथ जाधव गंभीररित्या  होरपळले. दुपारी उन्हाची वेळ असल्याने व वणव्याची आग जोरात भडकली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी काशिनाथ जाधव यांच्या पत्नी सौ. सविता जाधव  त्यांच्यासोबत काजूच्या बागेची साफसफाई करीत होत्या. त्यांनी आपल्या पतीला आगीने वेढल्याचे पाहून त्यांनी पतीला वाचविण्याचा प्रयत्न केला व जोरजोराने आरडाओरड केली. मात्र, बागा गावापासून दूर असल्याने त्यांचा आक्रोश कोणालाही ऐकू आला नाही. त्यानंतर त्यांनी  गावाकडे धाव घेत घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.  मात्र, तोपर्यंत काशिनाथ जाधव यांचा मृत्यू झाला होता. काशिनाथ जाधव यांच्या मागे त्यांच्या पत्नी, तीन मुली व दोन मुलगे असा परिवार आहे. मृत काशिनाथ जाधव यांचा मृतदेह विच्छेदनासाठी मंडणगड ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेने आणण्यात आला. मात्र, मंडणगडमध्ये शवविच्छेदनाची कोणतीही व्यवस्था नसल्याने व कुंबळे येथेही शवविच्छेदन होत नसल्याने अखेर जाधव यांचा मृतदेह दापोली येथे  पाठविण्यात आला आहे.