Fri, Mar 22, 2019 08:08होमपेज › Konkan › ‘मालवणी’ला राजाश्रयही हवा : गवाणकर

‘मालवणी’ला राजाश्रयही हवा : गवाणकर

Published On: May 13 2018 10:22PM | Last Updated: May 13 2018 10:14PMकणकवली : प्रतिनिधी

‘वस्त्रहरण’ नाटकाला साहित्यसम्राट पु. ल. देशपांडे यांचा 1980 साली आशीर्वाद मिळाला आणि वस्त्रहरणचे प्रयोग हाऊसफुल्ल झाले, त्यानंतर मालवणी नाटकांची रांग लागली. मालवणी बोली भाषेला लोकमान्यता मिळाली. मालवणी माणूस शहरातही बिनधास्तपणे मालवणी बोलायला लागला. एवढेच नव्हे तर दूरचित्रवाणी, वृत्तपत्रे, रेडिओ, चित्रपट यामध्येही मालवणी भाषेने मानाचे स्थान मिळविले. मालवणी बोली भाषेत कमालीचा जिव्हाळा आहे. तो वृद्धिंगत करणार्‍या मालवणी भाषेला आता राजाश्रयही मिळायला हवा, तरच निश्‍चितपणे मालवणी भाषेचा झेंडा फडकत राहील, असा विश्‍वास ‘वस्त्रहरणकार’ आणि मालवणी बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, नाटककार गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केला.

मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या पाचव्या मालवणी बोली साहित्य संमेलनाचे आयोजन रविवारी डॉ. विद्याधर करंदीकर साहित्यनगरी, वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे करण्यात आले होते. सिंधुभूमी कला अकादमी आयोजित या संमेलनाचे उद्घाटन रविवारी सकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू तथा कणकवली- हळवल गावचे सुपूत्र डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नाटककार गंगाराम गवाणकर तर  सिंधुभूमी कला अकादमीचे अध्यक्ष प्रमोद जठार हे स्वागताध्यक्ष होते. नगराध्यक्ष समीर नलावडे, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, प्रा. विश्‍वास मेहेंदळे, मालवणी बोली साहित्य संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण लळीत, कार्यवाह सतीश लळीत, ज्येष्ठ कवी मधुसूदन नानिवडेकर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून तसेच मालवणी भाषेत गार्‍हाणे घालून श्रीफळ वाढवत या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. 

संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वस्त्रहरण नाटकाची निर्मिती, या नाटकाला पु.ल. देशपांडे यांचे मिळालेले आशीर्वाद, नाटकाचा लंडन प्रवास, नाटकातील कलाकारांच्या गंमती जंमती याचे विवेचन केले. ते म्हणाले, मालवणी भाषेनेच आपणास जगण्यासाठी आणि शिकण्यासाठी अनंत गोष्टी दिल्या. मालवणी भाषेमुळेच मी घडलो. या मालवणी बोली भाषेत एक आगळा वेगळा गोडवा आहे, तो मालवणी माणसाने जपायला हवा. या भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी डॉ. बाळकृष्ण लळीत, सतीश लळीत, माजी आ. प्रमोद जठार यांनी मालवणी बोली साहित्य संमेलनाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न निश्‍चितच कौतुकास्पद आहेत. मालवणी बोली भाषेला लोकाश्रयाबरोबरच राजाश्रय मिळाला तर आजची तरूण पिढी मालवणी बोली भाषेतील साहित्याला जगाच्या साहित्यात स्थान मिळवून देईल यात तिळमात्र शंका नाही. लघू चित्रपट या क्षेत्रातही आजच्या तरूण पिढीने अभ्यासू वृत्तीने प्रवेश केला आहे. मालवणी भाषेचा हा झेंडा असाच फडकत राहण्यासाठी मालवणी माणसाने या मालवणी बोली भाषेचा सन्मान करायला हवा, असे गवाणकर म्हणाले. 

 प्रमोद जठार यांनी मालवणी बोली भाषा ही आपल्या पूर्वजांची भाषा आहे, म्हणून ती टिकायला हवी. ही भाषा बोलताना मिळणारा आनंद आणि गोडवा वेगळाच आहे. या भाषेच्या संवर्धनासाठी या भाषेवर अभ्यासक्रम सुरू व्हायला हवा, असे ते म्हणाले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मालवणी शिकविण्यासाठी प्रत्येकाने मालवणी बोलले पाहिजे असे सांगत कणकवलीतील अशा उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. 
 संदेश पारकर यांनी मालवणी भाषा आपुलकीने बोलली जाते. ती महाराष्ट्रातील जनतेलाही आवडते. प्रमोद जठार यांनी या भाषेच्या संवर्धनासाठी राजकारणापलिकडे जावून या संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.  प्रा. विश्‍वास मेहेंदळे यांनीही त्या त्या प्रांतातील भाषेचे संवर्धन होणे आवश्यक असल्याची बाब अधोरेखित केली.

 प्रास्ताविक डॉ. बाळकृष्ण लळीत व सतीश लळीत यांनी करताना मालवणी बोली साहित्य संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. ज्या बोली भाषेचे कुठलेही लिखित साहित्य नाही ती भाषा लवकर संपते हे लक्षात घेता मालवणी भाषा टिकविण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे मत डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन अभिजीत पवार, विलास खानोलकर, सौ. गीतांजली कामत यांनी केले. कवी मधुसुदन नानिवडेकर यांनीही विचार मांडले.  कार्यक्रमात मालवणी कवींसहीत सिंधुदुर्गातील अनेक कवींचा सत्कार करण्यात आला. संमेलनास मालवणी भाषाप्रेमी उपस्थित होते. सायंकाळच्या सत्रात फुले कवी संमेलन झाले.