Sat, Apr 20, 2019 18:44होमपेज › Konkan › पूरमधील पालखीने शोधल्या लपवलेल्या खुणा

पूरमधील पालखीने शोधल्या लपवलेल्या खुणा

Published On: Mar 12 2018 10:54PM | Last Updated: Mar 12 2018 9:07PMदेवरूख : वार्ताहर

संगमेश्‍वर तालुक्यातील पूर येथील सोमेश्‍वर, केदारलिंग, पावणाई व विठ्ठलाई ग्रामदेवतेच्या पालखीने आदल्या दिवशी मानकर्‍यांनी लपवून ठेवलेली खूण शोधली. शुक्रवारी पार पडलेला खुणा काढण्याचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मोठी जत्राही भरली होती.

कोकणात शिमगोत्सवानंतर खुणा काढण्याची प्रथा पूर्वांपार रूढ आहे. खुणा काढण्याच्यादिनी उत्साहाला उधाण येते. शिमगोत्सवात कोणतीही चूक न होता कार्य निर्विघ्नपणे पार पडले याची साक्ष ग्रामदेवता यावेळी पटवून देते, अशी अख्यायिका आहे. याचप्रमाणे पूर येथील ग्रामदेवतेची पालखी खुणा काढण्याच्या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात नाचवण्यास प्रारंभ करण्यात आला. पालखी लपवलेल्या खुणेचा शोध घेत होती. याकडे सर्व भाविकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. 

पन्नास मिनिटांच्या कालावधीत पालखीने खूर लावून जमिनीत लपवलेली खूण शोधून काढली. यावेळी भाविकांनी ग्रामदेवतेच्या नावाने एकच जल्लोष केला. प्रमुख झेपले व वेले मानकर्‍यांच्या उपस्थितीत ही खूण बाहेर काढण्यात आली.

हा क्षण पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होती. या ठिकाणी दुकानदारांनी सकाळपासून आपली दुकाने थाटली होती. मिठाई, शितपेय, शोभेच्या वस्तू यांनी संपूर्ण परिसर फूलून गेला होता. खुणा काढून झाल्यानंतर पालखी नाचवत वाजत गाजत मंदिरात नेण्यात आली. रूपे काढून शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली. ग्रामस्थांच्या एकोप्याचे दर्शन यावेळी घडले.