होमपेज › Konkan › दीडपट हमीभावाचे गाजर; ‘भात’ उपेक्षित

दीडपट हमीभावाचे गाजर; ‘भात’ उपेक्षित

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 09 2018 10:19PMचिपळूण : समीर जाधव

उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव शेतकर्‍यांना मिळावा, या मागणीला अखेर केंद्र शासनाने हिरवा कंदील दिला असला तरी कोकणातील भात पिकाला मात्र दीडपट भाव मिळालेला नाही. अन्य पिकांच्या हमी भावापेक्षा सर्वात कमी भाव भात पिकाला मिळाला आहे. त्यामुळे कोकणचा भात उत्पादक शेतकरी नाराज झाला असून चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अवघी 200 रुपये वाढ मिळाली आहे. 

गेल्या निवडणुकीत भाजपने शेतकर्‍याला दीडपट हमी भाव देणार म्हणून आश्‍वासन दिले होते. ही आश्‍वासनपूर्ती कधी होणार म्हणून शेतकरी प्रतीक्षेत होता. शेतकरी कर्जमाफीतील घोळ यामुळे नाराज असलेल्या शेतकर्‍याला खूश करण्यासाठी मोदी सरकारने शेतमालाचे वाढीव हमीभाव जाहीर केले. तब्बल चार वर्षे या हमी भावात वाढ झालेली नव्हती. मात्र, कोकणातील भात उत्पादक शेतकर्‍यांना अल्प वाढ मिळाली आहे.  कोकणातील भात उत्पादक शेतकर्‍यांनी पिकविलेले भात गत दोन वर्षे शासनाने खरेदी केलेले नव्हते. 

त्यामुळे येथील शेतकर्‍यांची अडचण झाली होती. यावर्षी मात्र ही खरेदी झाली. शिवाय मागील तीन वर्षे 1550 ते 1590 रुपये क्‍विंटल दराने भात खरेदी शासनाने केली होती. मात्र, वाढीव हमी भाव देताना केंद्र सरकारने कोकणच्या शेतकर्‍याला अवघी 200 रुपयांची वाढ केली आहे. 

राज्यातील अन्य कृषी उत्पादनांचे हमी भाव वाढवून मिळाले आहेत. परंतु, भाताला फक्‍त 200 रु. हमी भाव मिळाला आहे.सर्वात वाढीव हमीभाव कारळ (काळे लांब तीळ )ला मिळाला असून 1827 रु. वाढ मिळाली आहे. त्यानंतर मुगाला 1400रु., तीळ 949, सूर्यफूल 1288,भुईमूग 440, कापूस 1130, उडीद 400, बाजरी 525, ज्वारी 730 रुपये अशी हमी भावात वाढ झाली आहे. मात्र, भाताला फारशी अपेक्षित वाढ मिळालेली नाही. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. मात्र, शासनाने केलेली हमी भावातील वाढ ही भात उत्पादन खर्चाच्या दीडपट नाही. चार वर्षे हमी भावात वाढ झालेली नव्हती. त्यामुळे आता झालेली वाढ तुटपुंजी आहे. ही वाढ उत्पादित खर्चाच्या दीडपट होत नाही. त्यामुळे येथील शेतकरी नाराजी व्यक्‍त करीत आहे. सध्या कोकणात भात लावणीचा हंगाम सुरु आहे. या शेतीच्या कामात शेतकरी असल्याने या शेतकर्‍यांचे लक्ष नाही. भाताला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळाल्यास कोकणातील भात शेती ओस पडणार नाही, अशा भावना शेतकरी व्यक्‍त  करीत आहेत.

कोकणात आता संकरित भात बियाणाचा वापर होत असल्याने भाताचे उत्पादन वाढले आहे. मात्र, त्यामानाने भाताला दर मिळत नसल्याने शेतकरी भात शेतीपासून दूर जात आहे.

नाचणी खातेय भाव....
उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देताना केंद्र शासनाने मात्र कोकणातील नाचणीला झुकते माप दिले आहे. नव्या दराप्रमाणे नाचणीला 997 रुपये दरवाढ मिळाली आहे. गेल्यावर्षी 1900 असणारा दर आता 2897 रु झाला आहे.कोकणात नाचणी चांगली होते. मात्र अलीकडे तिचे उत्पादन कमी झाले आहे. आता मात्र नाचणीला भाव आल्याने शेतकरी नाचणी शेतीकडे वळून अधिक फायदा घेतील अशी अपेक्षा आहे.