Sun, Jul 21, 2019 16:15
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › तोतया पोलिसांकडून दोन वृद्धांची लुबाडणूक

तोतया पोलिसांकडून दोन वृद्धांची लुबाडणूक

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 10:45PMकणकवली/ कुडाळ : प्रतिनिधी

आपण पोलिस अधिकारी असल्याचे भासवून वृद्धांना किंवा महिलांना लुबाडण्याच्या घटना सातत्याने घडत असतानाही, यापासून बोध घेण्यात नागरिक कमी पडत असल्याचे दिसते. पोलिस अशा प्रकारांना आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. शुक्रवारी कणकवली व कुडाळ येथे घडलेल्या अशाच दोन घटनांमुळे ही बाब अधोरेखीत झाली आहे. या दोन्ही घटनांमध्ये भामट्यांनी आपण पोलिस असल्याचे भासवत दोन वृद्धांजवळील दागिने, रोकड, मोबाईल असा ऐवज लांबविला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

 सीआयडी ऑफिसर असल्याचे भासवून वृद्धाला लुबाडले

सातरल-खालचीवाडी येथील जनार्दन केशव राणे (वय 74) हे कणकवली तहसील कार्यालयानजीक एका झेरॉक्स सेंटरवर झेरॉक्स काढण्यासाठी जात असताना एका अज्ञात भामट्याने आपण सीआयडी ऑफिसर असल्याची बतावणी करत त्यांच्याकडील मोबाईल, चिल्‍लर, अंगठ्या आणि सोन्याची चेन काढण्यास सांगून रूमालात बांधण्याचे नाटक करत 37 हजार 500 रु. चे दागिने लुबाडून पोबारा केला. ही घटना शुक्रवारी दुपारी 12.15 वा. च्या  सुमारास कणकवली तहसील कार्यालयानजीक एका झेरॉक्स सेंटरसमोर  घडली. 

शुक्रवारी जनार्दन राणे हे कणकवली तहसील कार्यालयात काही कामानिमित्त आले होते. एक झेरॉक्स काढायची असल्याने ते नजीकच्या एका झेरॉक्स सेंटरवर जात होते, त्याच वेळी एक 30 ते 35 वय, साधारण उंची साडेपाच फूट, रंग सावळा, अंगात फूल शर्ट, फूल पँट, देवानंद टाईप कॅप अशा वर्णनाच्या इसमाने आपण सीआयडी ऑफिसर आहोत, अशी बतावणी केली. तुम्ही दागिने घालून किंवा किमती वस्तू घेऊन फिरू नका, तुमच्याकडचा रूमाल द्या, असे सांगितले त्यावेळी राणे यांनी आपल्याकडील रूमाल काढून दिला त्यानंतर त्यांचा मोबाईल व चिल्‍लर तसेच हातातील दोन अंगठ्या, दीड तोळ्याची सोन्याची चेन असा मुद्देमाल काढण्यास सांगून रूमालात बांधण्याचे नाटक केले आणि तो रूमाल त्यांच्या हातात पुन्हा दिला. काही क्षणातच तो मोटार सायकलने तेथून पसार झाला. श्री. राणे हे त्यानंतर नजीकच्या झेरॉक्स सेंटरवर गेले त्यानंतर रूमालात पाहतात तर केवळ मोबाईल आणि चिल्‍लर होती. या घटनेने जनार्दन राणे यांना धक्‍काच बसला. आपण फसलो गेलो हे लक्षात आल्यानंतर श्री. राणे यांनी याबाबतची फिर्याद कणकवली पोलिसात दिली. याप्रकरणी अज्ञात भामटयाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

 पोलिस असल्याचे सांगत वृद्धाची चेन लंपास

पोलिस असल्याचे सांगत वाडी वरवडे समर्थवाडी येथील गोपाळ बाळा वरवडेकर (65) यांच्या गळ्यातील सोन्याची चेन दोन भामट्यांनी हातोहात लंपास केली. ही घटना शुक्रवारी दु. 11.15 वा. च्या सुमारास  कुडाळ रेल्वस्टेशन नजीक जुम्मा मस्जिदजवळ घडली.  गोपाळ वरवडेकर हे आपल्या मुंबईला जाणार्‍या मुलीला रेल्वे स्टेशनवर सोडून  चालत कुडाळ बस स्टँडकडे जात होते. जुम्मा मस्जिदजवळ दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले व त्यांनी आपण पोलिस असल्याचे सांगितले. या भागात चोर्‍या होेतात व याची आपण तपासणी करत आहोत, असे सांगत त्यांच्याकडील घड्याळ, मोबाईल, गळ्यातील सोन्याची चेन आदी वस्तू ताब्यात घेतल्या.  त्या सर्व वस्तू श्री. वरवडेकर यांच्याकडील बॅगेत ठेवल्याचे त्यांनी भासवले.  यावेळी त्या दोघांमध्ये चोर- पोलिसांप्रमाणे संभाषणही आली. एकाने आपल्याला सोडा अशी गयावया करण्याचे नाटक केल्याचे श्री. वरवडेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. नंतर ते मोटारसायकल वरून निघून गेले. काही वेळाने श्री. वरवडेकर यांनी आपली बॅग तपासली असता आत अन्य सर्व वस्तू आढळल्या, मात्र, सोन्याची चैन आढळली नाही. याबाबत त्यांनी  सायंकाळी पोलिसात फिर्याद दाखल केली.   या प्रकरणी दोन अज्ञातांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.