Mon, Jan 27, 2020 12:27होमपेज › Konkan › पोलिस असल्याचे सांगत रत्नागिरीत एक लाख लुबाडले

पोलिस असल्याचे सांगत रत्नागिरीत एक लाख लुबाडले

Published On: Jul 14 2019 2:23AM | Last Updated: Jul 14 2019 2:23AM
रत्नागिरी ः प्रतिनिधी

पोलिस असल्याची बतावणी करीत, बाजारात चोरी झाली असून तुझी बॅग तपासायची असल्याचे सांगत तरुणाला बाजुला घेऊन पिस्तुलाची धमकी दाखवत एक लाखाची रोकड लुटल्याचा प्रकार  बुधवारी रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलच्या रस्त्यावर घडला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राजापूर तालुक्यातील सोलगाव भंडारवाडी येथील अमित सुहास पाटील (38) हे पटवर्धन हायस्कूलजवळील रस्त्याने चालत जात असताना शाहीद सादीक मुजावर (27, बेलबाग, धनजीनाका) याने त्याला अडविले. आपण पोलिस असून पुढे चोरट्यांनी ज्वेलर्स फोडले आहे. तुझी बॅग तपासायची असल्याचेसांगत त्याला जबरदस्तीने छाया गेस्ट हाऊससमोरील इमारतीच्या बेस्टमेंटला घेऊन गेला.

या ठिकाणी अमित पाटील याच्या दोन कानाखाली  मारुन त्याला माझ्याकडे पिस्तुल असून तुला गोळ्या घालेन असा धाक दाखवला. त्याच्याकडील बॅग तपासून, त्यातील एक लाख रुपये रोख जबरदस्तीने काढून घेऊन पोबारा केला. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हा प्रकार घाबरलेल्या अमितने घरी जाऊन सांगितला. त्यानंतर शुक्रवारी रात्री याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या घटनेची दखल रत्नागिरी शहर पोलिसांसह उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली. या प्रकरणी शाहीद मुजावर याला शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता अटक करण्यात आली. उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.