Sun, Jul 21, 2019 12:01होमपेज › Konkan › राज्य मोतीबिंदूमुक्‍त करणार : ना. डॉ. सावंत

राज्य मोतीबिंदूमुक्‍त करणार : ना. डॉ. सावंत

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 11:42PM

बुकमार्क करा
देवगड : प्रतिनिधी

महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या सर्व्हेमध्ये आढळलेल्या कॅन्सर रूग्णांवर मोफत उपचार राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत केले जाणार असून राज्यातील सर्व मोतीबिंदू रूग्णांवर उपचार करून महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्‍त करण्याचा संकल्प राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी पत्रकारपरिषदेत व्यक्‍त केला.

आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत हे आपल्या वळीवंडे गावी शनिवारी आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये 1  ते 31 डिसेंबर या कालावधीत करण्यात सर्व्हेमध्ये 1 कोटी 78 लाख संशयित रूग्णांची तपासणी करून यामध्ये कॅन्सरचे निदान होणार्‍या रूग्णांवर मुंबई येथे टाटा हॉस्पिटमध्ये शासनाच्या आरोग्य विभागामार्फत मोफत उपचार केले जाणार आहेत. महाराष्ट्रामधील मोतिबिंदू असलेल्या रूग्णांसाठी मार्च महिन्यामध्ये अभियान राबवून त्या रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.या अभियानाद्वारे महाराष्ट्र मोतिबिंदूमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ.सावंत यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 90  आरोग्य उपकेंद्रामध्ये प्रथमच वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार  असल्याची माहिती डॉ.सावंत यांनी दिली.
मोंड प्रा. आ.  केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व देवगड उपजिल्हा रूग्णालयाचा कामाचा शुभारंभ महाशिवरात्री दिवशी  करण्यात येणार आहे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पाच प्रा. आ. केंद्रांना ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा देण्यात येणार आहे. यामध्ये शिरगांव, पडेल, बांदा, मुणगे, मसुरे या आरोग्य केंद्रांचा  समावेश आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी डॉ.दीपक सावंत यांची भेट घेवून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रूग्णांना गोव्यामधील शासकीय रूग्णालयामध्ये नि:शुल्क उपचार करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी आपण गोवा राज्याचा आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रूग्णांवर नि:शुल्क उपचार करण्यात येतील असे आश्‍वासन दिले असल्याचे डॉ.सावंत यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, निलेश सावंत, शरद शिंदे हे उपस्थित होते.

सिंधुदुर्ग व चंद्रपूर आरोग्य मॉडेल जिल्हे!

सिंधुदुर्ग व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आरोग्याचा दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना राबवून रूग्णांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असून भविष्यात हे दोन्ही जिल्हे महाराष्ट्रात आरोग्याचा दृष्टीने मॉडेल बनविण्याचा संकल्प असल्याचे ना. डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.  तीन वर्षांपूर्वी आरोग्याचा दृष्टिने महाराष्ट्र हे देशामध्ये सतराव्या क्रमांकावर होते ते आता तिसर्‍या क्रमांकावर आले असून येत्या काही महिन्यात आरोग्याचा दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावर  असेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.