Wed, Jun 26, 2019 23:49होमपेज › Konkan › क्रीडा स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया यापुढे ऑनलाईन 

क्रीडा स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया यापुढे ऑनलाईन 

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 03 2018 10:51PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

क्रीडा विभागामार्फत जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन होते. या क्रीडा स्पर्धांसाठी वैयक्‍तिक, तसेच सांघिक स्पर्धकांची प्रवेशासंबंधित सर्व माहितीसह त्यांचे ओळखपत्र व स्पर्धेचे प्रमाणपत्र अशी सर्व माहिती आता ऑनलाईन प्रक्रियेद्वारे होणार आहे. याबाबतच्या सॉफ्टवेअर खरेदीस व अनुषंगिक साहित्य खरेदीस जिल्हा क्रीडा परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे हे होते.

मागील वर्षापर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील क्रीडाशिक्षकांकडून शाळेची प्रत्येक खेळाची सांघिक व वैयक्‍तिक वेगवेगळी प्रवेशिका टाईप करून त्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेऊन क्रीडा कार्यालयाकडे सादर केली जात होती. तथापि, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे आता वेळेची बचत होण्याबरोबरच अचूक माहिती विहित वेळेत उपलब्ध होण्यामुळे नियोजित वेळेनुसार क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास मदत होणार आहे.

सिंथेटिक ट्रॅकच्या कामाला गती द्या

या बैठकीनंतर जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी रेंगाळलेल्या 400 मीटर सिंथेटिक धावन मार्गाच्या कामास गती देण्याची सूचना केली. जिल्हा क्रीडा संकुल परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा सध्या नाही. या ठिकाणी स्पर्धक तसेच क्रीडा रसिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी.  यासाठी वॉटर एटीएम बसविणे तसेच मैदानावरील गवत कापणीसाठी ग्रास कटर खरेदी करण्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

बैठकीस जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, पोलिस निरीक्षक दीपक गुजर, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी एन.डी.पारधी, कक्ष अधिकारी पी.के. कांबळे, उपअभियंता श्री. जोशी आदी उपस्थित होते. स्वागत व आभार जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले.