Sun, Mar 24, 2019 08:15होमपेज › Konkan › अभियंत्याला मारहाण करणार्‍या माजी नगरसेवकास अटक

अभियंत्याला मारहाण करणार्‍या माजी नगरसेवकास अटक

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 10:16PMमालवण : प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे कनिष्ठ अभियंता नितीन राजेंद्र दाणे यांना शिवीगाळ व धक्‍काबुक्‍कीप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या माजी नगरसेवक सुधीर मांजरेकर याला  शुक्रवारी मालवण पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली मांजरेकरची कार पोलिसांनी जप्त केली आहे.दरम्यान, अभियंत्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून काम केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोळंब पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना कनिष्ठ अभियंता नितीन दाणे व दोन कर्मचारी दुरुस्तीच्या कामावर गुरुवारी नियंत्रण करत होते. यावेळी सुधीर मांजरेकर हा आपल्या कारने कोळंब पुलावरून आचर्‍याच्या दिशेने जात होता. कोळंब पुलावरील बॅरिगेट्सला टेम्पो अडकला होता. बॅरिगेट्सला बाजूला घेण्याचे काम सुरू असताना सुधीर मांजरेकर याने आपल्या कारच्या काचा खाली करत अभियंता श्री. दाणे यांना बोलावून घेतले. आणि त्यांच्या कॉलरला पकडून कोळंब पुलाचे काम बंद करा वर्षभर पूल बंद करून ठेवलात असे सांगून त्यांना धक्‍काबुक्‍की केली. याबाबत दाणे यांनी काल मालवण पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानुसार मांजरेकर यांच्याविरोधात मारहाण व शिवीगाळ प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुधीर मांजरेकर याला अटक करून त्याची कारही जप्त केली. मांजरेकर याला उद्या 24 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली. अधिक तपास पीएसआय श्री. पाटील हे करत आहेत.