मालवण : वार्ताहर
मालवणात तब्बल सतरा तासांनी पूर्ववत झालेला वीजपुरवठा पुन्हा रात्री खंडित झाल्याने संतप्त नागरिकांनी रविवारी रात्री शहरातील देऊळवाडा येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. यात एका कनिष्ठ अभियंत्यास मारहाण झाली. तसेच देऊळवाडा व कुंभारमाठ येथील वीज उपकेंद्रात तोडफोड झाली. याप्रकरणी महावितरणच्या अधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मालवण-कुंभारमाठ येथील विनोद दत्ताराम भोगावकर (वय 46), दिलीप बाबू सांगवेकर (44) यांच्यावर मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजेच्या गडगडाटात चौके येथे मुख्य वीजवाहिन्या तुटल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. त्यामुळे तालुक्याचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला. वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू होते.
रविवारी सायंकाळी 7 वा. च्या दरम्यान शहरातील काही भागात वीज पुरवठा पूर्ववत झाला तर अन्य ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने खंडित वीज पुरवठ्यामुळे हॉटेल, लॉजिंग, रिसॉर्ट व्यावसायिकांची तसेच नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
शहरात पूर्ववत झालेला वीजपुरवठा रात्री 10.30 वा. च्या दरम्यान, पूर्णतः खंडित झाल्याने नागरिक संतप्त बनले. शहरातील विविध भागातील नागरिकांनी देऊळवाडा येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यालयात सुरक्षारक्षक उपस्थित होता. मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. संतप्त जमावातील काही जणांनी या कार्यालयातील खिडकीच्या काचा फोडल्या तसेच दूरध्वनीची केबल तोडून टाकली. याच दरम्यान कुंभारमाठ येथील वीज उपकेंद्राच्या ठिकाणी संतप्त नागरिकांनी गर्दी केली. याठिकाणीही काचा फोडून नुकसान करण्यात आले.
वीज पुरवठा खंडित झाल्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांकडून महावितरणचे कनिष्ठ अभियंता मंदार सावंत यांना मारहाण झाली. याप्रकरणी सोमवारी महावितरणच्या अधिकार्यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यात कुंभारमाठ येथील विनोद भोगावकर या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य एका संशयिताचा शोध घेतला जात आहे. संशयितांना उद्या 29 रोजी येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे अशी माहिती प्रभारी पोलिस अधिकारी अमोल साळुंखे यांनी दिली. दरम्यान, खंडित वीजपुरवठा पहाटे 4.30 वा. च्या दरम्यान पूर्ववत झाला. मात्र त्यानंतरही अधूनमधून वीजपुरवठा सातत्याने खंडित होत होता.