होमपेज › Konkan › गुहागर, देवरूख न.पं.साठी 6 एप्रिलला होणार मतदान

गुहागर, देवरूख न.पं.साठी 6 एप्रिलला होणार मतदान

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:08PMगुहागर : प्रतिनिधी

गुहागर, देवरूख नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 6 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून या निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीचे बिगुल वाजल्याने सर्व राजकीय पक्ष खडबडून जागे झाले आहेत. गुहागर आणि देवरूख नगरपंचायतींची ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार आहे.
जिल्हा निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार 12 ते 19 मार्च या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामांकन अर्ज स्वीकारले जातील. 20 मार्चला सकाळी 11 वाजता प्राप्त अर्जांची छाननी व 26 मार्चला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 6 एप्रिल रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत मतदान होईल.  7 एप्रिलला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. 

गुहागर, देवरूख नगरपंचायतींची ही निवडणूक विविध पक्षांनी अटीतटीची केली असून सर्वांनीच निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात केली आहे.  गुहागरात विद्यमान सत्ताधारी राष्ट्रवादी काँगेसला शह देण्यासाठी भाजपने वेगळी रणनिती आखली आहे. याबरोबरच कुणबी समाज आघाडीने निवडणुकीत आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादी काँगे्रसने आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी निश्‍चित केली असून आ. भास्कर जाधव हे विधानसभा अधिवेशनात असल्यामुळे ही यादी पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी म्हणून गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची चर्चा आता रंगू लागली आहे.

देवरूख नगरपंचायतीत सद्यस्थितीत शिवसेना विरोधी बाकावर असून भाजपने आपल्या सहकारी पक्षांच्या जोरावर सत्तेचे स्थान पटकावलेले आहे. भाजपला शह देण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी या निवडणूकीत उतरणार असून भाजपसह अन्य पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे.