Thu, Nov 15, 2018 20:33होमपेज › Konkan › कोंडगाव धरणावर नौकानयनासाठी प्रयत्न

कोंडगाव धरणावर नौकानयनासाठी प्रयत्न

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 9:32PMसाखरपा : वार्ताहर 

कोकण  विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते संजय यादवराव यांनी कोंडगाव ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी  शेतीविषयक विविध योजनांची चर्चा केली.  गावविकासासाठी पक्षविरहीत गट स्थापन करण्याचे आवाहन यादवराव यांनी केले. कोंडगाव धरणावर लवकरच बोटींगची परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्‍वासन त्यांनी दिले.

कोकण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार संजय यादवराव यांनी शनिवारी कोंडगाव ग्रामपंचायतीत सदिच्छा भेट घेतली. यावेळी सरपंच बापू शेट्ये यांच्याहस्ते यादवराव यांचा  सत्कार करण्यात आला. 

यादवराव यांनी उपस्थित ग्रामस्थांशी गाव विकासाबाबत दीर्घ चर्चा केली. गाव विकासासाठी केवळ शासकीय मदतीवरच सातत्याने अवलंबून न राहता स्वयंस्फूर्तीने हा विकास साधावा, असे आवाहन यादवराव यांनी केले. यासाठी  युवकांची फळी उभा करुन विकास साधावा व आवश्यक तेथे मुंबईस्थित चाकरमान्यांनाही मदतीला घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी विविध शेतीपुरक उद्योगांसाठी माती परीक्षणाची गरज उपस्थितांनी व्यक्‍त कली. यात अधिकांश वेळ लागत असल्यामुळे हे शक्य होत नसल्याचे मत मांडण्यात आले. यावर उपाय म्हणून लवकरच माती परीक्षणाचे मशीन कोंडगावात उपलब्ध करण्याचे आश्‍वासन यादवराव यांनी दिले. कोंडगाव येथील धरण ही एक पर्यटनाची जागा होवू शकते, याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले असता यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन यादवराव यांनी सरपंच बापू शेट्ये यांनी दिले.

या बैठकीस कोंडगावचे सरपंच बापू शेट्ये, भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणिस अमित केतकर, माजी सरकारी वकील प्रवीण नवाथे, श्रीधर कबनुरकर, पुर्ये येथील भाजप कार्यकर्ते राजीव लोटणकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.