Sun, Jul 21, 2019 16:40
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › ज्येष्ठ पत्रकार, संपादक प्रा. मुकुंदराव कदम यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, संपादक प्रा. मुकुंदराव कदम यांचे निधन

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:11PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

दै. सिंधुदुर्ग समाचारचे संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार, प्राचार्य मुकुंदराव हरी कदम (वय 85) यांचे रविवारी सायंकाळी 7 वा. सुमारास पुणे येथे त्यांच्या मुलीच्या निवासस्थानी आकस्मिक निधन झाले. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर रहाटेश्‍वर (गढीताम्हाणे, ता. देवगड) या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रा. मुकुंदराव कदम यांच्या निधनाने एक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि अभ्यासू पत्रकार काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दात सिंधुदुर्गातील पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली. 

प्राध्यापक ते पत्रकार

 प्रा. मुकुंदराव कदम यांनी सुरुवातीच्या काळात सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा केली. त्यानंतर कराड रयत शिक्षण संस्थेत ते अनेक वर्षे प्राध्यापक होते. नंतरच्या काळात वेंगुर्ले येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून त्यांनी सेवा बजावली. तेथूनच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि 1985 साली ‘सिंधुदुर्ग समाचार’ हे जिल्ह्यातील पहिले दैनिक सुरू केले.  बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते. स्वर्गीय शिवरामराजे भोसले, भाई सावंत, केशवराव राणे, एस.एन.देसाई तसेच माजी केंद्रीय कृषीमंंत्री शरद पवार या नेतेमंडळींशी त्यांचे जवळचे संबंध होते. गेल्या काही वर्षांपासून प्रा. मुकुंदराव कदम हे कोल्हापूर येथे स्थायिक झाले होते. प्रा. मुकुंदराव कदम यांच्या पश्‍चात पत्नी, 3 मुली, 1 मुलगा, भाऊ, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार राजन कदम यांचे ते काका होत.