Thu, Dec 12, 2019 08:51होमपेज › Konkan › सावधान!... ‘वायू’मुळे कोकणात दोन दिवस मुसळधार..!

सावधान!... ‘वायू’मुळे कोकणात दोन दिवस मुसळधार..!

Published On: Jun 14 2019 1:54AM | Last Updated: Jun 14 2019 1:54AM
पुणे : प्रतिनिधी

उत्तर महाराष्ट्र, कोकणात बहुतांश ठिकाणी शुक्रवारी (दि. 14), शनिवारी (दि. 15) मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. ‘वायू’ चक्रीवादळामुळे कोकण, घाटमाथा व उत्तर महाराष्ट्रातील बाष्पाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, पुढील दोन दिवस या भागांत दमदार पाऊस बरसेल, असा अंदाज आहे.

गेल्या 24 तासांत कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या काही जोरदार सरींनी हजेरी लावली. राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी येथे 50 मि. मी. एवढी करण्यात आली. विदर्भ वगळता राज्यातील सर्वच भागांतील कमाल तापमानात पावसामुळे गुरुवारी घट नोंदविली गेली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट व मराठवाड्यात किंचित घट झाली आहे. कोकणात सरासरी 30, मध्य महाराष्ट्रात सरासरी 34, मराठवाड्यात सरासरी 37, विदर्भात सरासरी 41 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले.

‘वायू’ चक्रीवादळ गुजरातच्या वेशीवर

‘वायू’ चक्रीवादळ गुरुवारी गुजरातच्या वेशीवर पोहोचले. भारतीय हवामान खात्याने गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजता घेतलेल्या नोंदीनुसार ‘वायू’ चक्रीवादळ दिऊपासून 170 सागरी किलोमीटर व पोरबंदरपासून 130 सागरी किलोमीटर अंतरावर होते. गुरुवारी रात्री उशिरापासून शुक्रवारी पहाटेपर्यंत सौराष्ट्राच्या गीर सोमनाथ, जुनागड, पोरबंदर, देवभूमी द्वारका येथे हे वादळ कधीही धडकू शकते. त्याचा वेग ताशी 135 ते 145 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत (दि. 15) गुजरात ते कोकण किनारपट्टीदरम्यानच्या मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. 

खोळंबलेला मान्सून

पुढील आठवड्यातच नैर्ऋत्य मोसमी पावसाची (मान्सून) आगेकूच पुढील आठवड्यातच होऊ शकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ‘वायू’ चक्रीवादळामुळे मोसमी वार्‍यांमध्ये खंड पडला असून, मान्सून गेल्या सहा दिवसांपासून केरळमध्येच खोळंबला आहे. केरळमधील कन्नूर येथे त्याची उत्तर सीमा (नॉर्दन लिमिट) गुरुवारीदेखील कायम होती. 8 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून, ‘वायू’ चक्रीवादळामुळे तो पुढे सरकला नाही. पुढील आठवड्यात पोषक वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. 
‘वायू’ची दिशा बदलल्याने 

संकट टळले ः ‘स्कायमेट’

वादळ थेट गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार नसून, त्याची दिशा बदलल्याने गुजरात यातून सुटणार असल्याचे ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. असे असले तरीदेखील गुजरातमध्ये पुढील 3-4 दिवस वादळी वार्‍यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.