Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Konkan › स्कूल चले ‘मद्यपी’ गुरुजींची ग्रामस्थांकडून वरात

स्कूल चले ‘मद्यपी’ गुरुजींची ग्रामस्थांकडून वरात

Published On: Jun 15 2018 11:49PM | Last Updated: Jun 15 2018 11:49PMराजापूर : प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागतांचे त्यांच्या शाळेत  वाजत-गाजत स्वागत होत असतानाच मद्यधुंद अवस्थेत शाळेत अवतरलेल्या  एका गुरुजींची ग्रामस्थांनीच वरात  काढली. चक्‍क पोलिस ठाण्यासह राजापूर ग्रामीण रुग्णालय व नंतर पंचायत समितीपर्यंत गुरुजींना नेल्याची घटना तालुक्यातील देवाचे गोठणे गावच्या ठोमरेवाडी शाळेत घडली. गेली तीन वर्षे मद्यपान करून शाळेत येणार्‍या या बहाद्दर शिक्षकाबद्दल सातत्याने तक्रारी होऊनदेखील  राजापूर पंचायत समिती प्रशासनासह शिक्षण विभागाने  दुर्लक्ष करीत त्याला पाठीशी घातले, असा आरोप देवाचे गोठणे ग्रामस्थांनी केला आहे.

उन्हाळी सुट्टी समाप्‍त होताच नवीन शैक्षणिक वर्षाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. शासनाच्या नवीन धोरणानुसार पहिल्या दिवशी येणार्‍या नवागतांचे वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मात्र, त्याचवेळी देवाचे गोठणे गावात वेगळेच घडले होते. तेथील ठोमरेवाडीतील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले एक गुरुजी तर चक्‍क मद्यपान करूनच अवतरले होते. 

गेल्या तीन वर्षांपासून त्या शाळेत कार्यरत असलेले हे गुरुजी कायम मद्यपान करूनच शाळेत येतात, अशा यापूर्वी अनेकवेळा ग्रामस्थांकडून तक्रारी झालेल्या होत्या; पण त्यापासून काहीच बोध न घेता शाळेच्या पहिल्याच दिवशी हे महाशय मद्यधुंद अवस्थेत शाळेत आले.

 आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या अनेक पालकांनी, विनायक दीक्षित व अन्य ग्रामस्थांच्या सहाय्याने ‘त्या’ शिक्षकाची बखोटी  धरुन ताबडतोब राजापुरात आणले. येथील ग्रामीण रुग्णालयात त्याची तपासणी केली असता तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तसा अहवाल दिला आहे. त्यानंतर राजापूर पोलिस ठाणे, पंचायत समिती व सरते शेवटी नाटे पोलिस ठाणे अशी त्याची वरातच ग्रामस्थांनी काढली.

यावेळी राजापूर पंचायत समितीमध्ये सर्व हजर झाले. पण तेथे गटविकास अधिकारी यांच्यासह  शिक्षण विभागाचा जबाबदार असा कुणीच अधिकारी कार्यालयात हजर नव्हता. अखेर पंचायत समिती सदस्य अभिजीत तेली व पंचायत समिती  प्रशासन व शिक्षण विभागाचे  काही अधिकारी यांनी आलेल्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी ‘असा’  शिक्षक  आता  आमच्या गावात नको, अशी मागणी विनायक दीक्षित यांनी केली. यावेळी आम्ही या शिक्षकाला त्या शाळेतून हटवून  तुमची पर्यायी व्यवस्था करु, शिवाय या प्रकरणी मद्यपान करुन शाळेत आलेल्या त्या शिक्षकावर कारवाई देखील करु, अशी ग्वाही पं. स. सदस्य अभिजीत तेली यांनी दिली.