Fri, May 24, 2019 08:26होमपेज › Konkan › डॉक्टरांचा सुकाळ.. पण औषधांचा दुष्काळ..!

डॉक्टरांचा सुकाळ.. पण औषधांचा दुष्काळ..!

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:08PMकुडाळ : प्रमोद म्हाडगुत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची वाणवा असल्यामुळे रुग्णांना चांगल्याप्रकारे सेवा मिळत नसल्याची ओरड आहे. मात्र कुडाळ ग्रामीण रूग्णालयात चांगले वैद्यकीय अधिकारी असून देखील आवश्यक तो औषधपुरवठाच होत नसल्याने रूग्णांना अपेक्षित सेवा मिळत नाही अशी स्थिती आहे. याबाबत सत्ताधारी सोडाच विरोधकही सुशेगात असल्यामुळे कुडाळ ग्रामीण रूग्णालयाची आरोग्य यंत्रणा नाजूक अवस्थेकडे झुकत आहे परिणामी सर्वसामान्य रूग्णांची परवड होत आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कुडाळ तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात प्रतिदिन रुग्णांची संख्या वाढतच आहे. महामार्ग, रेल्वे हाकेच्या अंतरावर असल्यामुळे अपघाताचे रूग्ण याच रूग्णालयात अधिक येतात. विशेष म्हणजे हदयरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, भूलतज्ज्ञ व बालरोगतज्ञ असे  चार महत्वाचे वैद्यकीय अधिकारी या रूग्णालयात  कार्यरत आहेत. त्यांच्याकडून रूग्णांना चांगल्याप्रकारे सेवा दिली जाते. मात्र, शासनाकडून आवश्यक असणारा औषधपुरवठा होत नसल्यामुळे या डॉक्टरांकडून रूग्णांना सेवा देताना मर्यादा पडतात. परिणामी रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. जवळपास 130 च्या आसपास ग्रामीण रूग्णालयात औषधांची आवश्यकता असते. त्यामधील 87 औषधे अत्यावश्यक असतात.  ती रूग्णालयामध्ये असणे आवश्यकच आहे. मात्र, गेले काही दिवस औषधांचा तुटवडा जाणवू लागल्याने त्याचा रूग्ण सेवेवर मोठा परिणाम होवू लागला असल्याचे बोलले जात आहे. पूर्वी तीन ते सहा महिन्यात औषध  पुरवठा चांगल्याप्रकारे होत होता मात्र वरिष्ठ पातळीवरून पुरवठ्याबाबतची धोरणे बदलल्यामुळे औषध पुरवठ्यात अनियमितता निर्माण झाला. याचा फटका रूग्णसेवेवर होत असल्याचे दिसून येते. 

कुडाळ ग्रामीण रूग्णालयातील लॅबमध्ये कायमस्वरूपी लॅब टेक्निशियन नाही. सद्यस्थितीत क्षय तंत्रज्ञ व एचआयव्ही तंत्रज्ञ यांच्याकडे लॅब टेक्निशिएशनचा अतिरिक्‍त भार सोपविण्यात आला आहे. वास्तविक मोठ्या संख्येने रूग्ण असलेल्या या रूग्णालयात कायम लॅब टेक्निशियन असणे आवश्यक आहे. दुसरीकडे एक्सरे मशीनकरिता एक्सरे टेक्निशियन केवळ तीन दिवसच कुडाळ ग्रामीणमध्ये येत आहे. उर्वरीत चार दिवसाचे काय? त्या दिवसात रूग्णांना एक्सरे काढायचा झाला तर रूग्णांनी कुठे आधार घ्यावा? असा सवाल रूग्णांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लॅब टेक्निशियन व एक्सरे टेक्निशियन पद वरिष्ठ स्तरावरून तत्काळ भरावे, अशी मागणी होत आहे.

सत्ताधारी सुशेगात विरोधक लक्ष देतील का?

मे संपून आता जून महिना उजाडेल, त्या महिन्यात पावसाळी मोसम सुरू होतो. विशेष म्हणजे या पावसाळी मोसमाच्या सुरूवातीला आंब्रड,  माणगांव आदी भागात प्रतिवर्षी विविध साथरोगांचा हमखास प्रादुर्भाव होतो. औषधांचा तुटवडा अशाप्रकारे राहिला तर त्या रूग्णांना योग्य ते उपचार मिळू शकणार नाहीत त्यामुळे जनतेतून आतापासूनच चिंता व्यक्‍त केली जात आहे. याबाबत सत्ताधारी तसेच विरोधी राजकीय मंडळींनी वेळीच लक्ष द्यावा, अशी मागणी कुडाळ तालुक्यातील जनतेतून केली जात आहे.

आमदारांचे आरोग्याच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष का?
कुडाळ विधानसभा हा सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेल्या वैभव नाईक यांचा मतदारसंघ आहे. सुदैवाने डॉ. दीपक सावंत त्यांच्याच पक्षाचे असून पालकमंत्री, खासदार सुध्दा त्यांचेच आहेत. असे असताना कुडाळ सारख्या महत्वाच्या अशा आरोग्य संस्थेकडे औषध पुरवठ्याबाबत दुर्लक्ष का? असा सवाल रूग्ण, नातेवाईक व कुडाळवासीयांमधून उपस्थित केला जात आहे.