होमपेज › Konkan › गांजासह युवकाला अटक, बांदा पोलिसांची कारवाई

गांजासह युवकाला अटक, बांदा पोलिसांची कारवाई

Published On: Jan 27 2018 1:08PM | Last Updated: Jan 27 2018 1:03PMसावंतवाडी : प्रतिनिधी

गांजा व तत्सम पावडरसह सोनुर्ली येथील एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई बांदा पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा सोनुर्ली येथे केली. ही कारवाई सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केल्याने ताब्यात घेतलेला युवक व गांजा आता पुढील तपासासाठी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

शुक्रवारी रात्री काही युवक गांजा घेऊन जात असल्याची माहिती बांदा पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर बांदा पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अन्य काही युवकही सहभागी असल्याचा संशय पोलिसांना व्‍यक्‍त केला आहे. सध्या सावंतवाडीत गांजा प्रकरण गाजत असतानाच बांदा पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. सावंतवाडीत काही दिवसांपूर्वी गांजा सेवन करणाऱ्या महाविद्यालयीन युवकांना शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर गांजा प्रकरणात सहभागी युवकांना ताब्यात घेण्यात सावंतवाडी पोलिसांना अपयशच येत असतानाच सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बांदा पोलिसानी कारवाई करत गांजा व युवकास ताब्यात घेतले आहे.