होमपेज › Konkan › आजगाव-भोमवाडीत पावणेसहा लाखांचे अंमली पदार्थ जप्त

आजगाव-भोमवाडीत पावणेसहा लाखांचे अंमली पदार्थ जप्त

Published On: Sep 01 2018 10:37PM | Last Updated: Sep 01 2018 10:37PMवेंगुर्ले: 

तालुक्यातील आजगाव भोमवाडी येथे फ्रेडी डॉमनिक फर्नांडिस याच्या घरावर धाड टाकून विनापरवाना 1 किलो 974 ग्रॅमचे अंमली पदार्थ, सिंगल बॅरल काडतुस बंदूक, 6 जिवंत काडतुसे,133 गावठी हात बॉम्ब गोवा नार्कोटिक्स विभागाने तसेच वेंगुर्ले पोलिसांनी संयुक्‍त कारवाई करत जप्त केले. 30 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत अंमली पदार्थ, बंदूक व दारुसाठा मिळुन सुमारे 6 लाख 24 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी पसार आहेत. 

आजगाव भोमवाडी येथील घर क्रमांक 486 मध्ये फ्रेडी डॉमनिक फर्नांडिस यांच्या घरात विनापरवाना गैरकायदा अंमली पदार्थ असल्याची माहिती गोवा नार्कोटिक्स विभागाचे अधीक्षक जितेंद्र रंजन यांना मिळाली होती. यासंदर्भात त्यांनी वेंगुर्ले पोलिसांना कळवले.पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ. कोळेकर, घाडीगांवकर, महिला पोलिस पालयेकर, कॉन्स्टेबल अभिजित कांबळे यांनी फर्नांडिस यांच्या घरावर रात्री 2 च्या सुमारास धाड टाकली.मात्र, फर्नांडिस घरी सापडला नाही.नार्को टिक्स विभागाच्या अधीक्षकांनी पोलिसांच्या समक्ष घराची झडती घेतली असता 1 किलो 974 ग्राम वजनाचे सुमारे 6 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ तसेच एक सिंगल स्मूथ  सुमारे 10 हजार रुपये किमतीची काडतुस बंदूक, एका प्लास्टिकच्या डब्यात असलेली सुमारे 1800 रुपये किमतीची 6 जिवंत काडतुसे व एका सफेद रंगाच्या कापडी पिशवीत सुमारे 13 हजार 300 रुपयांचे 133 गावठी बॉम्ब आढळून आले. याबाबत फ्रेडी याच्या घरात कोणाच्याही नावावर बंदूक परवाना नसल्याने हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. हे.कॉ.अभिजित कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फ्रेडी फर्नांडिस याच्या विरोधात भादवी कलम 286, बारी पदार्थ अधिनियमन 1908 कलम 5, शस्त्र अधिनियमन 1905 कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.