Sun, Dec 15, 2019 02:09होमपेज › Konkan › माकड व वन्य प्राण्यांकडून होणार्‍या नुकसानीची दुप्पट भरपाई मिळणार

माकड व वन्य प्राण्यांकडून होणार्‍या नुकसानीची दुप्पट भरपाई मिळणार

Published On: Jul 11 2019 1:34AM | Last Updated: Jul 11 2019 12:24AM
कणकवली : वार्ताहर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेती व बागायतींचे माकडांकडून होणार्‍या नुकसानीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी कृषिमंत्री अनिल बोंडे, पालकमंत्री दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, माजी आ.राजन तेली यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत माकड व इतर वन्य प्राण्यांकडून होणार्‍या नुकसानीच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच माकडांकडून होणार्‍या नुकसानी संदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना यावेळी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी अधिकार्‍यांना केल्या, अशी माहिती आ. वैभव  नाईक यांनी दिली. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावे डोंगराळ भागात वसलेली असून येथील शेतकरी शेती व बागायतीमधून उत्पादन घेतलेल्या मालाची विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. जिल्ह्यात भात शेती, ऊस उत्पादन, नारळ, केळी बागायती शेतकरी उत्पन्न मिळवितात. मात्र, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या बागायतीचे व शेतीचे माकडांकडून होणारे नुकसान वाढले आहे. प्रचंड प्रमाणात होणार्‍या नुकसानामुळे शेतकरी शेती बागायतींची लागवड करण्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. त्यामुळे माकडांचा हा उपद्रव थांबविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आ. वैभव नाईक यांनी कृषिमंत्र्यांना सांगितले. 

यावर कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी माकड व इतर वन्य प्राण्यांकडून होणार्‍या नुकसानीच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्यात यावी.  त्याचप्रमाणे सौरकुंपणाच्या अनुदानासाठी प्रस्ताव  घ्यावेत, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, कृषी अधिकारी श्री. इंगळे, शिवाजी शेळके, सहसचिव गणेश पाटील, शिरीष जमराडे, सहाय्य्क वनसंरक्षक सुभाष पुराणिक उपस्थित होते.