Wed, Mar 27, 2019 04:20होमपेज › Konkan › दोडामार्ग, बांद्यात पूरस्थिती 

दोडामार्ग, बांद्यात पूरस्थिती 

Published On: Jul 11 2018 10:21PM | Last Updated: Jul 11 2018 9:56PMदोडमार्ग/सावंतवाडी : शहर वार्ताहर

दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. तिलारी नदी दुथडी भरून वाहत असल्याने दशक्रोशीतील घोटगेवाडी, भेडशी, परमे, कुडासे कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अनेक गावांचा संपर्क तालुक्याशी तुटला होता.

तालुक्यात मंगळवारी मध्यरात्रीपासून बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. नदीनाले दुथडी भरून वाहत होते. तिलारी नदीला पूर आल्याने अनेक कॉजवे पाण्याखाली गेले होते. यामुळे केर, मोर्ले, घोटगेवाडी आदी गावांचा संपर्क तालुक्याशी तुटला होता. भेडशी-खालचा बाजार, झरेबांबर, उसप, खोक्रल, आयी, कुडासे आदी कॉजवे पाण्याखाली गेले होते. तालुक्याचा वीजपुरवठा बारा तास खंडित होता. बुधवारी संध्याकाळी पूर्ववत झाला होता. दोडामार्ग-म्हावळणकरवाडी येथील तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची सिमेंट काँक्रिटचे आच्छादन असलेली भिंत कोसळली आणि ती वाहत गेली. दुसर्‍या ठिकाणी भिंतीला तडे गेले असून ही भिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे. कालवा फुटून शेतकर्‍यांच्या जमिनीचे नुकसान झाल्यास कालवा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी दिला आहे. तळकट येथे धावत्या एसटीवर झाडाची फांदी पडून नुकसान होण्याची घटना बुधवारी घडली. मात्र, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थांनी एसटीवर पडलेली फांदी काढण्यात मदतकार्य केले. बुधवारी संध्याकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

सावंतवाडी तालुक्यातील बांदा भागात तुफान पावसाने बुधवारी कहर करत सावंतवाडी तालुक्याला झोडपून काढले. तेरेखोल नदी तुडूंब भरून वाहत असल्याने लगतच्या अनेक भागात पाणी शिरले. बांदा बाजारपेठ जलमय झाली होती. शेर्ले येथे घर कोसळल्याने सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले आहे.

मंगळवारपासून तालुक्यात पावसाने रौद्र रूप धारण केले आहे.सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. बुधवारी दिवसभर तुफान पावसाने तालुक्याला झोडपून काढले. सरमळे, चराठा, कोलगाव, होडावडे आदी पुलांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सहयाद्री पट्ट्यात तुफान पाऊस पडत असल्याने तेरेखोल नदी अक्षरशः दुथडी भरून वाहत आहे. यामुळे बांदा बाजारपेठेत बुधवारी पाणी शिरले.बाजारपेठेतील गटारे अक्षरशःतुंबली. दुकानाच्या फरशीतून पाण्याचे लोट बाहेर आल्याने अनेक दुकाने व घरात हे पाणी शिरले.विलवडे येथील कालवे पाण्याने पूर्ण भरले आहेत. कालव्यातील पाणी आसपासच्या परिसरात शिरून शेतीचे नुकसान झाले आहे.गेले काही दिवस तुफान पाऊस पडत असल्याने शेती व बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.