होमपेज › Konkan › दोडामार्गात धर्मांतराचा प्रकार आला उघडकीस

दोडामार्गात धर्मांतराचा प्रकार आला उघडकीस

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 25 2018 9:56PMदोडामार्ग : प्रतिनिधी

दोडामार्ग-सावंतवाडी भागात हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या जागरूक नागरिकांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्यानंतर नागरिकांनी संबंधितांना पकडून दोडामार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकारामुळे दोडामार्गमध्ये दिवसभर तणावाचे वातावरण होते. 

गोव्यातून आलेल्या दोन स्त्रिया हिंदू धर्मातील गोरगरीब लोकांना धर्मांतर करण्यासाठी भाग पाडत आहेत, अशी माहिती काही जागरूक नागरिकांना मिळाली. त्याचा जाब विचारण्यासाठी हिंदूधर्मीय नागरिक त्या ठिकाणी गेले असता, घरात आरडाओरड सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी घरात जाऊन विचारणा केली असता जाब विचारण्यासाठी गेलेल्या लोकांवरच गोव्यातून आलेल्या लोकांनी हल्ला करून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्या सर्वांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी हिंदूंच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रकार तालुक्यात राजरोस सुरू असल्याचा  आरोप यावेळी करण्यात आला. तसेच असे प्रकार करणार्‍यांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान याबाबतची चौकशी दोडामार्ग पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होती. 

धर्मांतराचा प्रकार गंभीर 

दोडामार्ग : प्रतिनिधी

दोडामार्ग शहरात हिंदू धर्मीयांचे धर्मांतर करण्याचा प्रकार जो उघडीस आला तो गंभीर आहे. सध्या फक्त पोलिसांच्या ताब्यात दिले. यापुढेही असे प्रकार चालूच राहिले तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. तालुक्यात आणि अन्य ठिकाणी ही धर्मांतराचा प्रकार होत असल्याची चर्चा आहे. प्रशासन व राज्यकर्त्यांनी याकडे गंभीरतेने पाहावे. जर ते निष्फळ ठरले तर प्रसंगी कायदा हातात घेऊन असे प्रकार थांबवू, अशी आक्रमक भावना शैलेश दळवी यांनी व्यक्त केल्या. 

दोडामार्ग शहरात शनिवारी सकाळी धर्मांतर प्रकरणावरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रोळी मंदिरात हिंदू धर्मियांची पत्रकार परिषद शनिवारी संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, पं. स. बाळा नाईक, गणेश गावडे, गोपाळ गवस, देवेंद्र शेटकर, दीपक गवस, कानू दळवी, अभिजित खांबल, प्रविण गवस, शैलेश दळवी आदी उपस्थित होते. यावेळी गणेश गावडे म्हणाले, गोव्यातील धर्मांतराचे लोण आता दोडामार्गात आले आहे. हे मुळासकट उखडून काढले पाहिजे. दोडामार्गवासियांनी दाखविलेली एकजुट सर्वांनी दाखवून धर्मांतराचा हा प्रकार रोखला पाहिजे.