Sat, Apr 20, 2019 08:45होमपेज › Konkan › डोंगरी विकास कार्यक्रमात दोडामार्गचा समावेश

डोंगरी विकास कार्यक्रमात दोडामार्गचा समावेश

Published On: Jun 15 2018 11:49PM | Last Updated: Jun 15 2018 11:02PMकणकवली : प्रतिनिधी

डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत सद्यस्थितीत 22 जिल्ह्यांतील 73 पूर्णगट डोंगरी तालुके व 35 उपगट डोंगरी तालुक्यांचा समावेश आहे. शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या तरतुदीप्रमाणे नवीन तालुक्यांची निर्मिती केल्याने अस्तित्वातील डोंगरी तालुक्यांच्या विभाजनाने नव्याने निर्माण झालेल्या दोडामार्ग, त्र्यंबकेश्‍वर आणि माहूर या तीन पूर्णगट व विक्रमगड, देवळा, फुलंब्री या तीन उपगट तालुक्यांचा समावेश डोंगरी विभाग विकास कार्यक्रमात करण्यात आला आहे. 

त्यामुळे डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाखाली समाविष्ट दोडामार्ग, त्र्यंबकेश्‍वर, माहूर या तीन पूर्णगट व विक्रमगट, देवळा, फुलंब्री या तीन उपगट डोंगरी तालुक्यांमध्ये सध्याच्या प्रचलित आदेशानुसार आवश्यक त्या योजना राबविल्या जाणार आहेत. या योजना राबविण्यासाठी 2018-19 या वित्तीय वर्षापासून पूर्णगट डोंगरी तालुक्यास 1 कोटी व उपगट डोंगरी तालुक्यास 50 लाख इतकी तरतूद स्वतंत्रपणे उपलब्ध करण्यात येणार आहे. 

राज्यातील सर्व विभागांचा समतोल विकास व्हावा, असे शासनाचे धोरण आहे. त्याद‍ृष्टीने डोंगरी विभागाच्या काही विशिष्ट गरजा असल्याचे आढळून आल्याने डोंगरी विभाग निश्‍चित करण्यासाठी शासनाने काही निकष निश्‍चित केले आहेत. त्यानुसार सद्यस्थितीत राज्यातील 22 जिल्ह्यातील 73 पूर्णगट डोंगरी तालुके व 35 उपगट डोंगरी तालुक्यात डोंगरी विभाग विकास कार्यक्रम राबविला जातो. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या, परंतु केवळ विभाजनाने नवनिर्मित तालुके, तसेच नवीन तालुक्यात विभाजनाने समाविष्ट झालेल्या गावांना पूर्वीपासून मिळत असलेल्या डोंगरी विभाग विकास कामाच्या लाभापासून वंचित रहावे लागत होते. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत तालुका व त्यात सामाविष्ट गावे हा निकष असल्याने पूर्वीच्या डोंगरी तालुक्यात समावेश असलेल्या व केवळ अस्तित्वातील डोंगरी तालुक्यांमधून विभाजन होऊन निर्माण झालेल्या तालुका/गावांना डोंगरी क्षेत्रात समाविष्ट  करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार  शासनाने हा निर्णय घेतला आहे.